ताजी बातमी ऑनलाईन टीम
इंडियन प्रीमियर लीगच्या क्वालिफायर 2 मध्ये, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ अंतिम फेरीत पोहोचण्याच्या इराद्याने राजस्थानशी भिडणार आहे. साखळी फेरीत राजस्थानचे बंगळुरू विरुद्ध पारडे जड राहिले होते. पण बाद फेरीतील दडपण वेगळे असते आणि राजस्थान संघाला हे चांगलेच माहीत आहे. दुसरीकडे बंगळुरूने सलग दोन सामने जिंकून प्लेऑफमध्ये स्थान मिळवले. त्यातच शेवटच्या सामन्यात दिल्लीचा मुंबईने दिल्लीचा केलेला पराभव आरसीबीच्या फायद्याचा ठरला. दरम्यान, क्वालिफायर 1 मध्ये चांगली धावसंख्या करूनही राजस्थानचा पराभव झाला होता. आता बंगळुरूने क्वालिफायर 2 मध्ये राजस्थानविरुद्धचा सामना जिंकल्यास, एलिमिनेटर खेळून अंतिम फेरी गाठणारा आयपीएल इतिहासातील तो तिसरा संघ बनेल. सध्या या यादीत चेन्नई आणि सनरायझर्स हैदराबादचा संघ आहे.
चेन्नईने 2012 मध्ये मुंबईविरुद्ध एलिमिनेटर सामना खेळून त्यात 38 धावांनी विजय नोंदवून अंतिम फेरीत गाठली होती. मात्र, अंतिम सामन्यात कोलकात्याकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबादने अशीच कामगिरी केली. त्यावेळच्या डेव्हिड वॉर्नरच्या संघाने 22 धावांनी एलिमिनेटर सामन्यात कोलकाताविरुद्ध विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश केला. अखेर हैदराबादने अंतिम सामन्यात आरसीबीचा पराभव करून आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले. याचबरोबर एलिमिनेटर सामना खेळून अंतिम सामना जिंकणारा तो पहिलाच संघ ठरला.