ताजी बातमी ऑनलाईन टीम
राजस्थानमध्ये (Rajasthan) धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन सख्ख्या बहिणींनी आपल्या दोन मुलांसह सामुहिक आत्महत्या (Rajasthan Triple Suicide) केली आहे. या सामुहिक आत्महत्येच्या घटनेमुळे राजस्थानमध्ये एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तीन बहिणींमधील दोन बहिणी या गरोदर होत्या. तिघींनी आपल्या दोन मुलांसोबत विहिरीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली आहे. या महिलांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी (Dowry) छळ करत असल्याचे सांगत या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप केला आहे.
आत्महत्या केलेल्या तिन्ही महिलांची नावे कालू मीना (25 वर्षे), ममता (23 वर्षे) आणि कमलेश (20 वर्षे) असल्याचे सांगितले जात आहे. या तिघींनी दोन चिमुकल्यांसह आत्महत्या केली आहे. यामधील एक मुलगा 4 वर्षांचा तर दुसरा फक्त 27 दिवसांचा होता. या सामुहिक आत्महत्येमुळे महिलांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या महिलांच्या कुटुंबीयांनी असा आरोप केला आहे की, तिघींचे सासरचे मंडळी हुंड्यासाठी त्यांचा छळ करत होते. तसंच ते त्यांना मारहाण सुद्धा करायचे. या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.
मृत बहिणींचा चुलत भाऊ हेमराज मीनाने सांगितले की, ‘माझ्या बहिणींचा हुंड्यासाठी छळ केला जात होता. त्या 25 मे पासून बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्याचबरोबर राष्ट्रीय महिला आयोगाकडेही दाद मागितली होती. पण आम्हाला मदत मिळाली नाही. दरम्यान, सामुहिक आत्महत्या करण्यापूर्वी या तिन्ही बहिणींनी सुसाईड नोट लिहिली नाही. त्यांनी आत्महत्या केलेल्या ठिकाणी पोलिसांना (Rajasthan Police) काहीच पुरावे सापडले नाहीत.