सध्या महाराष्ट्रात काही ठिकाणी तसेच मुंबईत भयंकर उकाड्याचे वातावरण आहे. एका बाजूला पाऊस आणि दमट वातावरण तर दुसऱ्या बाजूला उन्हाचा तडाखा बसत आहे. अशातच यावर्षी मान्सून लवकरच दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने सांगितला आहे. दरम्यान आता काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे वातावरण झालेले आहे तर काही ठिकाणी पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. अशातच एक आनंदाची बातमी आली आहे.
एरवी 7 जूनला महाराष्ट्रात दाखल होणारा मान्सून यावर्षी लवकरच दाखल होणार आहे. यंदाच्या वर्षी तीन-चार दिवस आधीच मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत मान्सून गोवा आणि दक्षिण कोकणात दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.
मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्राला आणखी आठवडाभर मान्सूनची वाट पहावी लागणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून 10 जूननंतरच मुंबईत येईल. नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, कर्नाटकचा आणखी काही भाग,कोकण-गोव्याचा काही भाग, तामिळनाडूचा आणखी काही भाग,नैऋत्य बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग,प.म. बंगालचा उपसागर,ई. बंगालचा उपसागर, ईशान्य राज्ये,SHWB,सिक्कीम पुढील 2 दिवसांत जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.