ताजी बातमी ऑनलाईन टीम
राज्यसभा निवडणुकीसाठी दाखल केलेले अर्ज मागे घेण्याची मुदत आज (दि.३) दुपारी साडे तीन वाजता संपली. तिसऱ्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेने अर्ज दाखल केला आहे. परंतु दोन्हीही पक्षांकडून अर्ज कायम ठेवल्याने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले. ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यसभेची (Rajya Sabha elections) दुसरी जागा मागे घेण्याची भाजपची महाविकास आघाडीला ऑफर होती. त्यांना विधान परिषदेला मदत करण्याची भाजपने तयारी दर्शवली होती. परंतु, त्यांनी ती मान्य केली नाही. महाविआघाडीने ऑफर नाकारल्याने सहाव्या जागेसाठी भाजप-सेनेमध्ये निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीने आज ११.३० नंतर आमच्याशी संपर्क साधला नाही, असे सांगत भाजप तिसरी जागा जिंकणारच, असा दावाही पाटील यांनी यावेळी केला.
दरम्यान, राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीने भाजपला दिलेला प्रस्ताव भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धुडकावून लावला होता. भाजप हा राष्ट्रीय पक्ष असल्याने पक्षासाठी राज्यसभेची जागा महत्त्वाची आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने तिसरी जागा आमच्यासाठी सोडावी. त्याबदल्यात विधान परिषदेची पाचवी जागा न लढवण्याबाबत विचार करू, असे पाटील यांनी म्हटले होते.