कोल्हापूरची वरदायिनी असलेली पंचगंगा प्रदूषणाच्या जोखडातून बाहेर पडणार कधी, असा अनेक वर्षांपासूनचा सवाल आजही कायम आहे. प्रदूषणाची तीव्रता कमी होत आहे; मात्र त्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची गती वाढायला हवी, त्यासाठी नियोजनबद्ध आणि कालबद्ध प्रयत्नांची आवश्यकता आहे.
पंचगंगा प्रदूषण गेल्या दहा-पंधरा वर्षांतील ऐरणीवरचा विषय होता. पंचगंगेच्या प्रदूषणाची उच्च न्यायालयाने दखल घेतली. प्रदूषण नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर देखरेखीसाठी नियंत्रण समिती स्थापन केली आहे. दर तीन महिन्यांनी त्याचा अहवाल न्यायालयात
सादर केला जात आहे. यामुळे पंचगंगा प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना सुरु झाल्या आहेत. मात्र, त्याला अपेक्षित गती येत नसल्याचे चित्र अजूनही काही ठिकाणी आहे.