ताजी बातमी ऑनलाईन टीम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वॉरंट हुकूम बजावूनही ते हजर न राहिल्याने शिराळा न्यायालयाने बुधवारी त्यांना पुन्हा अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. पुढील सुनावणी 11 जुलै 2022 रोजी होणार आहे. तसेच मनसे नेते शिरीष पारकर यांनी न्यायालयात हजर राहून जामीन दिल्याने त्यांचा अजामीनपात्र वॉरंटचा आदेश रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती अॅड. रवी पाटील यांनी दिली.
अॅड पाटील म्हणाले, शिराळा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आरोपी क्र. नऊ तर शिरीष पारकर हे आरोपी क्र. दहा म्हणून समाविष्ट आहेत. यापूर्वी या दोघांनाही न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंटचा आदेश बजावला होता. त्याप्रमाणे शिरीष पारकर यांनी आज न्यायालयात हजर राहून जामीन दिला. राज ठाकरे हे वॉरंट हुकूम देऊन देखील न्यायालयात हजर न राहिल्याने न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध पुन्हा वॉरंट बजावले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे, जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत व शिरीष पारकर यांच्यासह दहा जणांवर बेकायदेशीर जनसमुदाय गोळा करणे, शांततेचा भंग करणे, चुकीच्या मार्गाने हुसकावणे, घोषणाबाजी करणे अशा विविध कलमाखाली तसेच खटल्याच्या सुनावणीला गैरहजर राहिल्याबद्दल त्यांच्यावर शिराळा न्यायालयात खटला दाखल आहे.
सन 2008 ला रेल्वेमध्ये मराठी तरुणांना नोकरीची संधी मिळावी म्हणून मनसेतर्फे आंदोलन करण्यात आले होते. याबद्दल कल्याण न्यायालयात राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी त्यांना रत्नागिरी येथे अटक करण्यात आली होती. त्यामुळे महाराष्ट्रभर मनसेने आंदोलन करून अनेक ठिकाणी बंद पुकारला होता.
यावेळी शिराळा तालुका मनसेकडून तानाजी सावंत यांनी शेडगेवाडी येथे बंद पुकारून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले म्हणून सावंत यांच्यासह अन्य जणांवर गुन्हे दाखल झाले होते.