कृती समितीने सोमवारी जाधववाडी, कदमवाडी, भोसलेवाडी, मुक्तसैनिक वसाहत परिसरातून बापट कॅम्प नाल्यात मिसळणाऱ्या पाच नाल्यांची, मलयगिरी अपार्टमेंटजवळील दोन नाले, सर्किट हाऊस पाठीमागील नाल्यांची पाहणी केली. त्यात नाल्यातील कचरा काढला आहे, पण रस्त्याखालून केलेले क्रॉसड्रेन, बंदिस्त असलेले मध्यम नाले प्लास्टिक बाटल्यांनी भरले आहेत. जिथे पुलाची गरज आहे, तिथे पाईपलाईनवरच काम चालवले जाते. पावसाळ्यात येथे पूरस्थितीचा धोका कायम असल्याचे कृती समितीचे मत आहे.
कृती समितीचे अॅड. बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, दुर्गेश लिंग्रस, माजी नगरसेवक राजसिंह शेळके यांनी राजारामपुरी चौकातून पाहणीला सुरुवात केली. यावेळी काही काळ उपायुक्त रविकांत आडसूळ, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार उपस्थित होते. राजारामपुरी चौकानजीक नाल्यांवर स्लॅब टाकून खाद्यपदार्थांच्या केबिन बसवल्या आहेत. नाल्यात साठलेल्या गाळामुळे स्लॅबपर्यंत केवळ तीन फुटांपर्यंतचे अंतर राहते. त्या जागेत जाऊन कचरा काढता आलेला नाही. त्यासाठी छोटी मशिनरी भाड्याने घेण्याचा पर्याय पुढे आला. तिथून लॉ कॉलेजकडे जाणाऱ्या या नाल्याच्या भिंतीत उगवलेल्या झाडाने नाला व्यापला असला तरी ते काढलेले नाही. दुतर्फा झुडुपांची गर्दी आहे. एका ठिकाणी संरक्षक भिंत ढासळली आहे. त्यामुळे पाण्यास आडकाठी येतच आहे.
टेंबलाईवाडी, रूईकर कॉलनी, महाडिक कॉलनी, सदर बाजार, कदमवाडी, भोसलेवाडी, जाधववाडी या परिसरातून सांडपाणी वाहून नेणारे नाले एकत्र येऊन बापट कॅम्प नाला बनून जाधववाडी ते कदमवाडीदरम्यान केलेल्या काँक्रिट रस्ता क्रॉस करतो. त्यासाठी जुन्या मोरीबरोबरच तीन पाईप टाकल्या आहेत. त्यातील एकाच पाईपमधून पाणी जाते. इतर मार्गात कचरा असल्याने पाणी पुढे जात नाही. रस्त्याच्या मागील भागात पाणी तुंबून राहणार आहे. तिथून भोसलेवाडी ते सर्किट हाऊसदरम्यान एका नाल्याचा प्रवाह एका हॉस्पिटलच्या बाजूने वळवला आहे. त्याच्या पाईप छोट्या असल्याने त्या अर्ध्या भरून वाहत होत्या. पावसात त्या तुंबून राहिल्याने पाणी परिसरात पसरेल.
‘मलयगिरी’ परिसराला धोका
मुक्तसैनिक वसाहतीजवळ असलेल्या मलयगिरी अपार्टमेंट, गजानन पार्क, पार्थ रेसिडन्सी परिसरात क्रॉसड्रेन केले आहे. तिथे ‘मलयगिरी’पासून पार्थ रेसिडन्सीकडून पुढे जाणाऱ्या नाल्यातील पाणी तुंबले आहे. तिथे असलेला नाला रस्ता ओलांडल्यानंतर चिंचोळा झाला आहे. तो एका ठिकाणी प्लास्टिक बाटल्यांनी अर्धा भरला आहे.
कर्मचारी गायब
लॉ कॉलेजजवळील नाल्यात पाईपलाईनमुळे अडकलेल्या प्लास्टिक बाटल्यांचा कचरा काढण्यासाठी साडेतीन वाजता दोन कर्मचारी उतरले होते. इतर ठिकाणची पाहणी करून कृती समिती परत या स्वच्छतेच्या ठिकाणी आली असता, काम अर्ध्यात टाकून कर्मचारी गेले होते.