Monday, July 7, 2025
Homeइचलकरंजीकोल्हापूर, हातकणंगलेतील भाजपचे उमेदवार ठरले?

कोल्हापूर, हातकणंगलेतील भाजपचे उमेदवार ठरले?

ताजी बातमी ऑनलाईन टीम

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात नावांची चर्चा : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत धनुष्यबाण विरूद्ध कमळ सामना रंगणार



राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेला धक्का आणि दणका देत धनंजय महाडिक यांना निवडून आणल्यानंतर भाजप राज्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यातही चांगलाच रिचार्ज झाला आहे. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबरोबर 2024 मधील लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका भाजप ताकदीने लढविणार आहे. लोकसभेच्या राज्यातीलच नव्हे तर कोल्हापूर आणि हातकणंगले मतदार संघातील उमेदवारांची नावे आमच्याकडे तयार आहेत, असे विधान सोमवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. यानंतर आता जिल्ह्याच्या राजकारणात भाजपचे ते उमेदवार कोण? याची चर्चा सुरू झाली आहे.


2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युती होती. त्यावेळी राज्यात युतीचे राज्यात 41 खासदार निवडून आले होते. त्यामध्ये भाजपच्या 23 आणि शिवसेनेच्या 18 खासदारांचा समावेश होता. कोल्हापूर जिल्हय़ात संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या रूपाने शिवसेनेचे दोन खासदार जिंकले होते. पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप-शिवसेना युती तुटली. शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या साथीने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. भाजपशी काडीमोड घेतला. त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात सामना रंगत आहे.

नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी भाजपने महाविकास आघाडीचे समर्थक अपक्ष आमदार फोडून शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धक्का दिला. महाडिक यांना निवडून आणत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पद्धतीने व्यूहरचना आणि कूटनीतीचे दर्शन घडविले. 20 जूनला होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीतही भाजपने गुप्त मतदान धक्का देण्याचा चंग बांधला आहे. निवडणुका जिंकण्याबरोबर महाविकास आघाडी सरकारला विविध पातळ्यांवर घेरण्याचे डावपेच भाजपने आक्रमकरित्या राबविण्यास सुरूवात केली आहे. मविआ सरकार पाडण्यापेक्षा या सरकारला बदनाम करत 2024 ची तयारी सुरू केली आहे.

लोकसभेचे उमेदवार ठरले या विधानाचा अर्थ आणि कारण प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत 2024 ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक भाजप स्वबळावर आणि पूर्ण ताकदीने लढविणार असल्याचे स्पष्ट करत लोकसभेचे आमचे उमेदवारही ठरले असल्याचे विधान केले. कोल्हापूर आणि हातकणंगलेच्या उमेदवारांचीही नावे निश्चित केल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता कोल्हापूर जिल्हयाच्या राजकारणात भाजपचे उमेदवार कोण असणार? याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. वास्तविक याआधी कोल्हापूर लोकसभेसाठी धनंजय महाडिक उमेदवार असतील हे स्पष्ट होते.

पण ते आता राज्यसभेवर गेल्याने त्यांच्या जागी दुसरयाला संधी मिळणार आहे. याआधी भाजपशिवसेना युतीमुळे कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदार संघात शिवसेनेचा उमेदवार असे. युती तुटल्याने आता बॅलेट पेपरवर 2024 मध्ये भाजपचा उमेदवार असणार आहे. त्यामुळे दोन उमेदवार कोण? याबद्दल चर्चाच नव्हे तर उत्सुकताही निर्माण झाली आहे. हातकणंगले मतदार संघातून भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे, भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासह रयत क्रांतीचे प्रमुख माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या नावांची चर्चा आहे. कोल्हापूर मतदार संघातून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह समरजितसिंह घाटगे यांच्या नावाभोवती चर्चा फिरत आहे. ऐनवेळी स्वराज्य संघटनेचे संस्थापक माजी खासदार युवराज संभाजीराजे यांनाही भाजप रिंगणात उतरवू शकते. अर्थात ही जर तरची गोष्ट आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीला अजून दोन अडीच वर्षे आहेत. मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडी एकसंघ राही तर माने आणि मंडलिक यांच्या धनुष्यबाणाच्या विरोधात भारकमळ असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -