Thursday, December 18, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : 'महाराजा ट्रॅव्हल्स'ची फसवणूक ; चौघांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर : ‘महाराजा ट्रॅव्हल्स’ची फसवणूक ; चौघांवर गुन्हा दाखल

‘महाराजा ट्रॅव्हल्स’च्या नावासह लोगोचा आणि ई-मेल आयडीचा बेकायदेशीर वापर करून फसवणूक केल्याप्रकरणी आज चौघांवर गुन्हा दाखल केला. नॅशनल टुरिस्टचे हनीफ राउतर (सांगली) आणि परवेझ हनीफ राउतर, पवन ट्रॅव्हल्सचे मनोज चौगले, व्यवस्थापक संदीप इंगळे (सर्व महालक्ष्मी चेंबर्स, मध्यवर्ती बस स्थानक परिसर) अशी त्या संशयितांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. शाहूपुरी पोलिस ठाण्यात याचा गुन्हा नोंद झाला आहे.

पोलिसांनी सांगितले, सुनील सुधाकर खोत मध्यवर्ती बस स्थानक समोरील हॉटेल महाराजा येथे राहतात. त्यांचा वडिलोपार्जित ‘हॉटेल महाराजा’ आणि ‘महाराजा ट्रॅव्हल्स’चा व्यवसाय आहे. ट्रॅव्हल्सचे मधुकर पाटील व्यवस्थापक आहेत. राज्यात या नावाचे ते एकमेव व्यावसायिक आहेत. ही कंपनी राज्यात प्रवास करण्यासाठी आराम व स्लिपरकोच बस बुकिंग करून प्रवाशांना सेवा देते. गरजेनुसार अद्ययावत सर्वसोयीनियुक्त वातानुकूलीत बसेस करार करून व्यवसायासाठी वापरल्या जातात. त्यामुळे या कंपनीने चांगला नावलौकिक प्राप्त केला आहे.

प्रवाशांचाही कंपनीवर विश्वास आहे. या कंपनीच्या नावाचा विशिष्ट लोगो, चिन्ह असून त्याची ट्रेडमार्क अॅक्ट १९९९ अंतर्गत नोंदणी केली आहे. त्यानुसार महाराजा ट्रॅव्हल्स या ट्रेड नावाचे हक्क सुरक्षित केले आहेत.

सर्वसाधारण डिसेंबर २०२० पासून कंपनीत काही प्रवासी रात्री अपरात्री येतात. आम्ही इंटरनेटवरून बुकिंग केलेली ‘महाराजा ट्रॅव्हल्स’ची गाडी आली नाही. गाडीत बैठक व्यवस्था चांगली नाही. वातानुकूलित व्यवस्था चांगली नाही. बस वेळेवर पोहचत नाही. उपलब्ध सेवा फारच निकृष्ट दर्जाच्या आहेत. अशा तक्रारी आल्या. चौकशीत नॅशनल टुरिस्टचे हनीफ राउतर, परवेझ राउतर, पवन ट्रॅव्हल्सचे मनोज चौगले आणि व्यवस्थापक संदीप इंगळे या संशयितांनी महाराजा ट्रॅव्हल्सच्या नावलौकिकाचा गैरवापर केला. स्वतः फायद्यासाठी वेबसाईटवर बनाव करून वेब अकौउंट सुरू केले.

त्याआधारे प्रवाशांची फसवणूक केली. महाराजा ट्रॅव्हल्सचा नाव लौकिक बदनाम करून फसवणूक केली अशी फिर्याद खोत यांनी दिली असून संशयितांवर गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. उपनिरीक्षक श्वेता पाटील अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, याकामी कायदेशीर माहितीसाठी अॅड. सर्जेराव सोळांकुरे यांचेही सहकार्य लाभल्याचे फिर्यादी सुनील खोत यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -