दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. दहावीचा निकाल जाहीर झाल्यापासून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला वेग आला आहे.. अकरावी प्रवेशासाठी राज्य शिक्षण मंडळाने ऑनलाइन सराव अर्जाची (माॅक) सोय उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे विद्यार्थी-पालकांची मोठी अडचण दूर झाली..
अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्जाचे एकूण दोन भाग होते. दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अर्जाचा पहिला भाग भरून झाला आहे, परंतु दुसरा भाग दहावीच्या निकालावर अवलंबून होता. दहावीचा निकाल जाहीर झाल्याने अकरावी प्रवेश प्रक्रियेला आता वेग आला आहे. अकरावी प्रवेशाचे (11th Admissions) ठळक मुद्दे जाणून घेऊ या..
अकरावी प्रवेश प्रक्रिया..
शून्य फेरी- सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होणार. त्याच वेळी व्यवस्थापन इनहाऊस व अल्पसंख्याक कोट्यांतील प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करता येतील.
नियमित फेरी- शून्य फेरीनंतर तीन नियमित फेऱ्या होतील. प्रत्येक फेरीच्या वेळी कॉलेज पसंतीक्रम बदलता येणार.
विशेष फेरी- नियमित फेऱ्यांमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी, तसेच प्रवेश प्रतिबंधित असलेल्या विद्यार्थ्यांना विशेष फेरीत संधी मिळणार.
अतिरिक्त विशेष फेरी- एटीकेटी व प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त विशेष फेरी. द्विलक्षी विषयांचे प्रवेश समांतर प्रवेश प्रक्रिया राबवून पूर्ण केले जाणार.
मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रात अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होतात. शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या प्रवेशाची सुरुवात झाली असून, आतापर्यंत मुंबई विभागातून 2 लाख 40 हजार 569 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
कॉलेज पसंतीक्रम नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होणार असून, शून्य फेरीच्या वेळी विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीसाठी प्रवेश अर्ज भरणे, कॉलेज पसंतीक्रम नोंदविता येणार आहे.
परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ
दरम्यान, दहावीचे पुनर्परीक्षार्थी, खासगी, तसेच श्रेणी सुधार योजनेंतर्गत व एखादा विषय घेऊन जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ दिलीय. नियमित परीक्षा शुल्कासह 30 जूनपर्यंत अर्ज करता येईल. 1 ते 4 जुलैपर्यंत अर्ज केल्यास विलंब शुल्क भरावे लागेल. विद्यार्थी www.mahahsscboard.in
या वेबसाईटवर अर्ज भरू शकतात.
नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, तसेच कॉलेजांमधील भौतिक सुविधांची तपासणी सुरू असल्याने अकरावी प्रवेश प्रक्रिया संथ गतीने सुरु आहे. मात्र, पुढील दोन दिवसांत फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर करणार असल्याची माहिती राज्याचे माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली.