शिवसेनेतील बंडाळीने महाविकास आघाडी सरकारसमोर अडचणींचा डोंगर उभा केला असला तरी ठाकरे सरकारने बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाची(Cabinet) बैठक घेत निर्णयांचा धडाका लावला.
औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशीव’ अशा नामांतरास मान्यता देण्यात आली, तर नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचाही निर्णय या मंत्रिमंडळ(Cabinet) बैठकीत घेण्यात आला. सामान्य प्रशासन विभागाकडून आलेल्या नामांतराच्या प्रस्तावांना मान्यता दिल्यानंतर आता ते केंद्र सरकारला पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर विभाग, जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका व नगरपालिका यांचे नामांतर करण्यात येईल. याबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे महसूल, वन विभाग तसेच नगरविकास विभागाकडून नियमानुसार करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. दिलेला शब्द पाळला नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेतली होती, तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खात्याचा कारभार असताना या विमानतळाला शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव होता. नवी मुंबईकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली असता मुख्यमंत्र्यांनी विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे आश्वासन दिले होते.
विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांना मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या(Cabinet) बैठकीत घेण्यात आला. यांची मुदत ३० एप्रिल २०२० रोजी संपली होती. तथापि, त्यांना मुदतवाढ दिली गेली नाही. हा निर्णय झाला असला तरी प्रत्यक्ष मुदतवाढीसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल.