मुंबई, ठाणे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्याचबरोबर मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. मुंबईसह उपनगरात आवश्यक असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडा, असे महापालिका प्रशासनानाने आवाहन केलं आहे.
मुंबईसह उपनगरात रात्रभर जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईत सकाळपासून रिमझिम पाऊस सुरु आहे. पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे पाच ते दहा मिनिटे उशिराने धावत आहे. वडाळ्यात सखल भागात 2 दिवसांपासून पाणीच पाणी आहे. अत्रे नगर ते अग्निशमन दल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. गेल्या 2 दिवसांपासून पाण्याचा निचरा झालेला नाही.
रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून अनेक नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना देण्यात आला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तिन्ही जिल्ह्यांतील धरणे धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचली आहेत.
कोल्हापूरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने पंचगंगेची पातळी वाढली. कोयना धरणात 33 हजार क्युसेकनं आवक सुरू आहे. कोयना धरणात 21 टीएमसी पाणीसाठा आहे. धरणातून कोयना नदी पात्रात विसर्ग सध्या तरी बंद आहे.
रत्नागिरी -खेडमध्ये पावसाचा जोर कमी झाला असला तरी जगबुडी नदीच्या पाणीपातळी इशारा पातळीवर पोहोचली आहे. त्याचबरोबर कोकणातील जवळपास सर्वच जिल्हांना पावसाने सलग 4 दिवस झोडपून काढलं आहे. रायगडला हवामान विभागाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अलिबाग, पेण, रोह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. माणगाव, महाड, पोलादपूरमध्ये मुसळधार पाऊस आहे. महाडमध्ये एनडीआरएफ, रेस्क्यू टीम तैनात करण्यात आल्या आहेत.