सध्या महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाने चांगलाच जोर धरला असून काही ठिकाणी अद्यापही प्रतीक्षाच नशिबी आली आहे. मुंबई, ठाणे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र (heavy rain fall in maharashtra) या भागांमध्ये गेल्या 2 दिवसांपासून धो धो पाऊस कोसळत आहे. मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसंच रायगड या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
जळगाव जिल्ह्यात धो धो पाऊस कोसळत आहे. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असल्याने हतनूर धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. तसेच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांची पाणी पातळी वाढली आहे, शिवाय काही भागांत दरड कोसळण्याच्या घटनाही घडल्यात. दरम्यान अमरावती जिल्ह्यातील (amaravati) अनेक तालुक्यात जोरदार पावसाने दैना उडाली आहे.
मोर्शी, तिवसा, धामणगाव रेल्वे तालुक्यात अतिवृष्टीसह वरूड, चांदूर बाजार, धारणी तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. दोन दिवस झालेल्या पावसाने अनेक गावे जलमय झाली. त्यामुळे हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले तसेच अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे.
तिवसा तालुक्यातील काही भागात सोमवारी आणि मंगळावारी झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे नदी-नाले तुडूंब झाल्याने अनेक गावात पाणी शिरले. जीवनावश्यक वस्तू धान्य वाया गेले असल्याने नागरिकांचे हाल झाले आहे.येत्या 4, 5 दिवस राज्यात मान्सून सर्वाधिक सक्रिय राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे तर विदर्भ,मराठवाड्यातही काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही मुसळधार पावसासाठी लक्ष ठेवावे लागेल, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.