गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत बुधवारी सकाळपासून जिह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे पंचगंगेची पाणीपातळी स्थिरावली असून महापुराचा धोका काहीअंशी टळला आहे. पण भारतीय हवामान वेधशाळेने जिह्यासाठी वर्तवलेल्या अंदाजानुसार 9 जुलैपर्यंत मोठय़ा प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषतः शुक्रवार दि. 8 जुलैपर्यंत रेड अलर्ट व 9 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नागरीकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिह्यात पुन्हा पावसाचा जोर वाढल्यास जिह्यात महापूरसदृष्य स्थिती निर्माण होऊ शकते. वेधशाळेने दिलेल्या पावसाच्या अंदाजानुसार सर्व नद्यांच्या पाणी पातळीमध्ये 5 ते 6 फुटांची वाढ होऊन 7 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी पाणीपातळी धोका पातळीस पोहचण्याची शक्यता आहे. जिह्यात डोंगराळ भागात भूःस्खलन, दरडी कोसळणे, स्थानिक नाल्यांना पूर येणे अथवा गावठाणातील जुन्या धोकादायक घरांची पडझड अशा घटना संभवत असल्याने नागरिकांनी आवश्यकती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागामार्फत केले आहे.
जयंती नाला ओव्हर फुल्ल
बुधवारी दिवसभरात पंचगंगा नदीची पातळी चार फुटाने वाढली. दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, गांधी मैदान परिसर, शाहूपुरी येथील सखल भागात पाणी साचून आहे. जयंती नाला ओव्हर फुल्ल झाला आहे. यामुळे संभाव्य पूराचा विचार करून महापालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे. नदी आणि नाल्यालगतच्या नागरिकांना स्थलातंरित करण्यासाठी शहरातील शाळा आणि हॉलमधील निवारा केंद्राच्या ठिकाणी विद्युत, पाणीपुरवठा अशा पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत.