‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील.. वक्के मधीय सगळं…’ आपल्या या डायलाॅगने महाराष्ट्रात फेमस झालेल्या सांगोल्याचे (सोलापूर) शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील एका अपघातातून थोडक्यात बाचवले. मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील ‘बापूं’च्या खोलीच्या छताचा काही भाग बुधवारी (ता. 6) मध्यरात्री कोसळला..
गेल्या काही दिवसांत आपल्या आगळ्या-वेगळ्या बोलीभाषेमुळे आमदार शहाजी बापू राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत. राज्यातील आमदारांच्या निवासासाठी मुंबईतील आकाशवाणी केंद्राजवळ भले मोठे आमदार निवास आहेत. त्यात प्रत्येक आमदाराला रुम दिलेली आहे.
नेमकं काय झालं..?
शहाजी बापू पाटील यांना दिलेल्या आमदार निवासातील रूमच्या छताचा काही भाग बुधवारी (ता. 6) मध्यरात्री अचानक कोसळला.. या घटनेच्या वेळी शहाजी बापू पाटील आपल्या रूममध्येच होते. रूममधील बेडवर सिलिंगचा मोठा भाग पडला.. सुदैवाने या अपघातातून ‘बापू’ थोडक्यात बचावले.
या घटनेनंतर आमदार शहाजी बापू यांच्या रूमचे फोटो सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.. या फोटोतूनच ही घटना मोठी असल्याचे दिसत आहे.. याबाबत शहाजीबापू पाटील यांची कोणतीही प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही, पण ते सुरक्षित व सुखरूप असल्याची माहिती मिळाली..
दरम्यान, शिंदे गटासोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांमध्ये शहाजी बापू यांचाही समावेश होता.. त्यावेळी ‘काय झाडी, काय डोंगर..’ हा त्यांचा संवाद जबरदस्त फेमस झाला नि शहाजी बापू हे नाव अनेकांना माहित झालं.. त्यानंतर मीडियाचाही त्यांच्याभोवती गराडा पडू लागला आहे..
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याभोवती जमा झालेल्या कोंडाळ्यामुळेच आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नव्हतं.. असा आरोप करतानाच, शहाजी बापू यांनी या लोकांची नावेही जगजाहीर केली होती.