राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून दमदार पावसाने (Maharashtra Rainfall) हजेरी लावली. जुलै महिन्यांच्या सुरुवातीपासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई (Mumbai Rain), ठाणे (Thane Rain) आणि कोकणासह (Kokan Rainfall) संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. अशामध्ये आता हवामान खात्याने आणखी एक इशारा (IMD Alert) दिला आहे. पुढचे 4 ते 5 दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या मुंबई शहर, उपनगरासह ठाणे आणि राज्यातील इतर भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे.
भारतीय हवामान विभागाचे (Indian Meteorological Department) प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये असे सांगितले आहे की, ‘राज्यात सध्या मान्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे राज्यात पुढचे चार ते पाच दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आगामी दोन ते तीन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.’
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढचे चार ते पाच दिवस सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे. काही दिवसांपूर्वीच हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्यानंतर आता पुन्हा अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पावसामुळे मुंबईतील रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. पावसामुळे रेल्वे वाहतूक उशिराने सुरु होती. तर रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतुकीवर देखील परिणाम होत आहे. अशामध्ये मुंबईकरांना देखील काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.