किणी; नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांना टोलमाफी देण्यासाठी आदेश काढले होते. यानंतर अनेक टोल नाक्यावर वारकऱ्यांकडून टोल वसुली होत असतानाच पुणे -बंगळूर महामार्गावरील किणी टोल नाक्यावर मात्र कुणाच्याही आदेशाशिवाय दरवर्षीप्रमाणे वाकऱ्यांना टोलमाफी दिली जात आहे. दरम्यान यावर्षीही वारकऱ्यांची शेकडो वाहने टोल न घेता सोडण्यात आली आहेत.
शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या आषाढी वारीच्या सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी होत असतात. कोरोनाकाळात दोन वर्षे वारीच नसल्याने यावर्षीच्या वारीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. दोन वर्षानंतर जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज यांच्या पालख्या ज्यावेळी आषाढी वारीसाठी पुण्यातून प्रयाण करतात. कोल्हापूर, बेळगाव, कोकणासह कर्नाटकातील हजारो भाविक पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी ट्रक, ट्रॅक्टर आणि जीप आदी वाहनांतून महामार्गावरून जात असतात. इतर ठिकाणी या वाहनांना टोल आकारला जात होता. मात्र, पुणे- बंगळूर महामार्गावरील किणी टोल नाक्यावर वारीच्या वाहनांना २००६ पासून टोल न घेण्याची परंपरा जपली असल्याचे चित्र दिसून आले.