गेल्या आठवड्यापासून धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. आज सकाळीच राधानगरी धरण 60 टक्के भरले असून, 1400 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात व अभयारण्य क्षेत्रात पावसाचा जोर वाढत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. असाच पावसाचा जोर राहिल्यास पुढील आठवड्यात धरण पूर्ण क्षमतेने भरेल असा अंदाज पाटबंधारे विभागाने वर्तवला आहे.
गेल्या वर्षी 25 जुलै रोजी धरण पूर्ण क्षमतेने भरून धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले होते. संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने योग्य काळजी घेतली असून खाजगी ‘बीओटी’ च्या तत्वावर असलेल्या वीज निर्मिती केंद्रातून 1400 क्यूसेक प्रतिसेकंद विसर्ग भोगावती नदीत सुरू असल्याने नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.
काल पासून शिरगाव बंधाऱ्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. पर्यायी तारळे व राशिवडे या मार्गावरून सद्या वाहतूक सुरू आहे. तसेच ओढ्या नाल्याचे पाणी भोगावती नदी पात्रात मिसळत असल्याने पडळी व पिरळ पुलाला घासून पाणी वाहत असल्याचे चित्र आहे.
आज दिवसभरात 126 मी मी इतका पाऊस नोंदण्यात आला असून, धरणाची पाणी पातळी 325,48 फूट इतकी आहे. पाणीसाठा 4842,09 (4-48टी एम सी) उपलब्ध आहे, एकूण पाऊस 1440 मी मी इतका नोंदण्यात आला असून 1400 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे.