कोल्हापूर जिल्ह्यातील गेल्या चार दिवसांत स्वाइन फ्लूचे नऊ रुग्ण आढळले आहेत. त्यांच्या संपर्कातील जवळपास दीडशेहून अधिक व्यक्ती स्वाइन फ्लू संशयित आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या असून, नऊ रुग्ण विविध रुग्णालयांत दाखल आहेत.
गेल्या दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाचा जोर आहे. त्यामुळे दलदल आहे. काही भागात पूरसदृश्यश स्थिती आहे. अशा वातावरणात आजारी पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. खासगी व शासकीय रुग्णालयातील उपचारासाठी येणाऱ्यांमध्ये स्वाइन फ्लूसदृश लक्षणे असणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.
सुरुवातीला ताप, सर्दी, खोकला, उलटी, शौचास लागणे अशा प्रकारची नियमित लक्षणे आहेत. हीच लक्षणे दुसऱ्या टप्प्यात वाढल्यास तसेच ताप अडतीस अंशापेक्षा जास्त होतो. घशातील खवखव तीव्र होते, तर तिसऱ्या टप्प्यात याच लक्षणांसह श्वास घेण्यास त्रास होतो. तीव्र स्वरूपाची अंगदुखी निर्माण होते, अशी लक्षणे असणाऱ्यांना स्वाइन फ्लूसदृश मानले जाते. अशा रुग्णांची संख्या दीडशेहून अधिक आहे.
वातावरणामधील बदलामुळे संसर्गजन्य आजार होण्याचे प्रमाण वाढत आहे. लक्षणे दिसताच तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत. – डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी.