वारणी कामगाराने माथाडी कामगाराला केलेल्या शिवीगाळ प्रकरणावरून शाहू मार्केट यार्डात बंद पडलेले कांदाबटाटे सौदे आज पोलिस बंदोबस्तात सुरू झाले, तरीही माथाडी कामगार सायंकाळपर्यंत काम बंदच्या भूमिकेवर ठाम होते. अखेर बाजार समितीने बैठक घेऊन तोडगा काढल्यानंतर उद्या गुरुवारपासून काम सुरू करणार असल्याचे पत्र माथाडी कामगारांनी सायंकाळी दिले. त्यामुळे या वादावर तूर्त पडदा पडला आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी एका तरुण वारणी कामगाराने वयस्कर माथाडी कामगाराला शिवीगाळ केली. यावरून दोघांत वाद झाला. हा वाद माथाडी कामगार संघटनेकडे गेल्यानंतर संघटनेने संबंधित वारणी कामगाराला निलंबित करावे, या मागणीसाठी शाह मार्केट यार्डातील कांदा बाजारात काम बंद आंदोलन केले. त्यानंतर बाजार समिती व माथाडी कामगार मंडळाने बैठक घेऊन माथाडी कामगारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तसेच शिवीगाळ केलेल्या वारणी कामगाराने माफी मागितली तरीही माथाडी कामगार काम बंद आंदोलनावर ठाम राहिले. त्यामुळे मार्केट यार्डातील सौदेस्थळी तणाव निर्माण झाला. अशात पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला. त्यानुसार आज पोलिस आले.
मार्केट यार्डातील कांदा बाजारात बुधवारी सकाळी साडेदहा वाजता म्हणजेच रोजच्यापेक्षा दोन तास उशिरा कांदा सौदे सुरू झाले. माथाडी कामगारांनी दुकानातील कांद्याची पोती सौद्याला लावली. सौदे झाल्यानंतर कांदा पोती पुन्हा थप्पीला लावणे, अशी कामे सुरू केली, तर सौदे पुढे सरकल्यानंतर बारा वाजल्यापासून वारणी कामगारांनीही गाड्यातील कांदा पोती गाडीत भरण्याचे काम सुरू केले. तरीही काही माथाडी कामगारांनी काम करण्यास नकार दिला.
दोन्ही बाजूकडून तणाव कायम होता; मात्र बाजार समिती सचिव जयवंत पाटील यांनी तसेच कांदा-बटाटा व्यापारी प्रतिनिधी आदी घटकांनी माथाडी कामगारांची समजूत काढली; मात्र काही माथाडी कामगार काम बंद करावे, संबंधित वारणी कामगाराला निलंबित करावे, अशी मागणी करीत होते.
दुपारी दोन वाजल्यानंतर सौदे संपले. पुढे माथाडी कामगारांनी पुन्हा काम बंद केले. माथाडी कामगारांनी आपसात चर्चा करून सायंकाळी उद्या गुरुवारपासून काम बंद आंदोलन मागे घेऊन पूर्ववत काम सुरू करण्यात येईल, असे पत्र दिले. त्यामुळे या वादावर तूर्त पडदा पडला आहे. त्यामुळे उद्यापासून सौदे व्यवहार पूर्ण वेळ सुरू होणार आहेत.