पोलिस असल्याची बतावणी करून तब्बल १ तोळे सोने लुबाडण्याची घटना गडहिंग्लजमधील भरवस्तीमध्ये घडली असून, गेल्या दोन महिन्यांमध्ये गडहिंग्लजमध्ये सलग घडलेल्या या प्रकाराने वयोवृद्धांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. वयोवृद्धांना लुटण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
घाळी कॉलनीमध्ये राहत असलेल्या सुलोचना धाकोजी या पती, मुलासह नातवाला डॉक्टर कॉलनीमधील दवाखान्यामध्ये घेऊन आल्या होत्या. नातवाला दाखवून झाल्यानंतर मुलगा व नातू हे औषधे घेऊन घराकडे गेले, तर सुलोचना व पती दंडाप्पा हे चालत घरी निघाले. याचवेळी भररस्त्यामध्ये दोघे तरुण आले व त्यांनी आम्ही पोलिस असून, या परिसरामध्ये चोरी झाल्याने तपासणी सुरू आहे, असे सांगून तुमच्याकडील दागिने दाखवा, अशी विनंती केली. दाम्पत्याने नकार दिला. मात्र, त्यावेळी तोतया पोलिसांचा आणखी एक साथीदार त्या ठिकाणी आला. त्याला या दोघांनी असेच सांगून त्याच्याकडील दागिन्यांची तपासणी करून ते दागिने त्याच्या खिशात ठेवण्यास सांगितले; मग त्या साथीदारानेही दाम्पत्याला पोलिसांकडून तपासणी करून दागिने खिशात ठेवून घरी ज सल्ला दिला.
यावर सुलोचना यांनी माझ्या भावाचे घर इथेच आहे. आम्ही तिथे जातो, असे सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी काहीही न ऐकता हातातील बांगड्या काढायला लावल्या. बांगड्या निघत नसतानाही जबरदस्तीने काढून त्या रुमालात बांधून परत दिल्याचे भासवले. दरम्यान, दाम्पत्य घरी येताच १ तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्यांऐवजी रुमालात बनावट बांगड्या असल्याचे लक्षात आले. त्यांच्या मुलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली; परंतु काही उपयोग झाला नाही. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. (crime news) दरम्यान, गडहिंग्लजला सलग दोन महिन्यांमध्ये हे प्रकार घडत असून, यामध्ये वृद्धांना टार्गेट केले जात आहे. पोलिसांनीच आता तपासणी मोहीम सुरू करून अशा टोळक्यांवर लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.