राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) चांगलाच कहर केला होता. या पावसामुळे राज्यातील अनेक भागांचे मोठे नुकसान झाले. अशामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाचा जोर बऱ्यापैकी कमी झाला आहे. पण आता विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रीय होणार आहे. 23 जुलै म्हणजे उद्यापासून राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने ( Meteorology Department) दिला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार दिवस मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा (IMD Alert) आहे. राज्यात मुंबईसह कोकण, नाशिक आणि मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी आणि काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
दरम्यान, राज्यात महिनाभरापासून सुरु असलेल्या पावसाने चांगलेच नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे अनेक गावांना फटका बसला. पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे जीवितहानीसोबतच वित्तहानी देखील झाली आहे. घराचे, शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये राज्यात आतापर्यंत 108 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 200 पेक्षा अधिक प्राणी दगावले आहेत. या पावसामुळे राज्यातील जवळपास 275 गावांना पावसाचा फटका बसला आहे. या पावसामुळे हजारो हेक्टर शेतीचे मोठे नुकसान झाले.