राज्यामध्ये कोरोनानंतर (Corona Update) स्वाइन फ्लूने (Swine Flu) चिंता वाढवली आहे. राज्यात स्वाइन फ्लूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. राज्यात आतापर्यंत 142 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. स्वाईन फ्लूमुळे आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूरामध्ये स्वाइन फ्लूचे संकट गंभीर होत चालले आहे. कोल्हापूरामध्ये स्वाइन फ्लूने तिघांचा मृत्यू झाला आहे.
राज्यामध्ये स्वाइन फ्लूने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. 8 जूनपर्यंत राज्यात स्वाइन फ्लूचे 8 रुग्ण होते. हळूहळू ही संख्या वाढत जाऊन रुग्णांचा आकडा 142 वर पोहचलो आहे. जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत गेली. मागच्या 10 दिवसांत स्वाइन फ्लूचे 126 रुग्ण आढळून आले आहेत. या आजाराच्या नियंत्रणासाठी सर्वेक्षण, प्रतिबंध आणि आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने (Health Department) दिली आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. या वर्षी 21 जुलैपर्यंत स्वाइन फ्लूचे 142 बाधित झाले आहेत. कोल्हापुरात 3 आणि पुणे आणि ठाण्यात प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत स्वाइन फ्लूचे 43 तर पुण्यात 23 आणि पालघरमध्ये 22 आहेत. नाशिकमध्ये 17 आणि नागपूर आणि कोल्हापूरमध्ये प्रत्येकी 14, ठाण्यात सात रुग्ण आहेत.
दरम्यान, स्वाइन फ्लूने कोल्हापूरात चिंता वाढवली आहे. कोल्हापूरात सध्या गंभीर परिस्थिती आहे. मागच्या 15 दिवसांत स्वाइन फ्लूने तिघांचा मृत्यू झाला आहे. तर 15 दिवसांत कोल्हापूरात स्वाइन फ्लूचे 12 रुग्ण आढळले आहेत. स्वाइन फ्लूच्या रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी कोल्हापूरात प्रशासनाकडून काहीच उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.