जिल्हा दौऱ्यावर प्रथमच आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांनी समर्थकांसह नाशिकमध्ये शक्तिप्रदर्शन केले. पाथर्डी फाटा येथे शिवछत्रपतींच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण केला. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी शनिवारी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून, त्यात यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच आलेल्या मुख्यमंत्र्यांचे पाथर्डी फाटा येथे शिंदे समर्थक व भाजपच्या कार्यकर्त्यांनी रात्री ११ वाजता जोरदार स्वागत केले. पाथर्डी फाटा येथे झालेल्या छोटेखानी समारंभात शिंदे यांनी राज्यात स्थापन झालेले युतीचे सरकार हे सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे सरकार असल्याचे सांगितले. पंढरपूर तीर्थक्षेत्राप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकसह सर्वच तीर्थक्षेत्रांचा विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबद्दल अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून, यासंदर्भात शनिवारी आढावा बैठक बोलावण्यात आली आहे. त्यात शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
नाशिकमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजनही करण्यात येत असून, विकासकामांच्या माध्यमातून नाशिकचा कायापालट करण्यात सरकार मागे-पुढे पाहणार नसल्याचे ते म्हणाले. अवघ्या काही वेळासाठी नाशिकमध्ये थांबलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पहिल्या दौऱ्याला काहीसा उशीर झाला असला तरी रात्री ८ वाजेपासून पाथर्डी फाटा येथे शिंदे(Chief Minister Eknath Shinde) समर्थक व भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
त्यांच्यासमवेत खा. हेमंत गोडसे, आ. सुहास कांदे., माजी आमदार काशीनाथ मेंगाळ उपस्थित होते. नाशिकमधून शिवसेनेने कोणतेही पदाधिकारी शिंदे यांच्यासोबत जाणार नसल्याचा शिवसेनेचा दावा या दौऱ्यात फोल ठरल्याचे दिसून आले. व्यासपीठावर मनपा स्थायी समितीचे माजी सभापती मामा ठाकरे यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी हजेरी लावली होती. यावेळी शिवसेनेचे काही कार्यकर्ते व भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिंदे समर्थक सेनेमध्ये प्रवेश कला. या साऱ्यांचे शिंदे यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांनी मालेगावकडे प्रयाण केले. वाटेमध्ये मुंबई नाका, तसेच द्वारका चौकामध्येही त्यांचे स्वागत झाले.