राज्यात झालेल्या मोठ्या सत्तानाट्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. अशात महाराष्ट्रात शिवसेनेला पुन्हा ताकद देण्यासाठी आदित्य ठाकरे सध्या शिवसंवाद यात्रा करत आहेत. पण आता याच शिवसेनेला आपलं करण्यासाठी एकनाथ शिंदेंही शर्यतीत असल्याचं पाहायला मिळतं. अशात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही
आदित्य ठाकरेंच्या पावलावर पाऊल ठेवत शिवसेना टिकवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे.
पहिल्या टप्प्यात आदित्य ठाकरे यांनी राजकीय पाया मजबूत करण्यासाठी ज्या-ज्या जिल्ह्यांचा दौरा केला आहे, त्याच जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील शुक्रवारपासून मोठ्या मोहिमेला सुरुवात करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता शिंदे विरुद्ध ठाकरे यांच्यातील राजकीय वर्चस्वाची लढाई आणखी तीव्र होणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील असलेल्या महाविकास आघाडीशी काडीमोड करत एकनाथ शिंदे हे भाजपच्या मित्रपक्षातून मुख्यमंत्री बनले. इतकंच नाहीतर तर त्यांच्या या भूमिकेमुळे अनेक कट्टर शिवसैनिकांनी पक्ष सोडून शिंदे गटाला हात दिला. अशात आता शिवसेनेवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राज्यात शर्यत सुरू आहे. आजोबा बाळासाहे . ठाकरे यांचा राजकीय वारसा पुन्हा मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि शिवसेना युवा युनिटचे अध्यक्ष आदित्य ठाकरे महाराष्ट्रात ‘शिवसंवाद यात्रा’ करत आहेत.आदित्य ठाकरे यांनी आपल्या यात्रेचा प्रवास संपवला. नाशिक, अहमदनगर, औरंगाबादसह काही जिल्ह्यातून हा प्रवास पार पडला. या यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेंवर आक्रमक असल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी खेड्यात जाऊन नागरिकांच्या मनात पुन्हा शिवसेना जागी करण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाहीतर आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांवरही जोरदार टीका करताना दिसले.