ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुंबई : गोरेगाव येथील पत्रा चाळ पुनर्विकास घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अखेर ईडीने रविवारी रात्री 12.40 वा. अटक केली. तत्पूर्वी राऊत यांची त्यांच्या भांडुप येथील राहत्या मैत्री बंगल्यावर सकाळी 7 ते सायंकाळी 4 पर्यंत तसेच येथील ईडीच्या कार्यालयात सायंकाळी 5.30 ते रात्री 12.40 पर्यंत अशी एकूण 16 तास चौकशी करण्यात आली. राऊत यांना उद्या ईडीच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी राऊत यांच्यासह त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची चौकशी सुरू केली. तब्बल नऊ तासांच्या चौकशीअंती ईडीच्या अधिकाऱ्यांनी राऊतांना ताब्यात घेऊन ईडीच्या बेलार्ड पिअर येथील कार्यालयात नेले. येथेही राऊत यांची चौकशी झाली. राऊत यांना अटक केली जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. तसेच घडले. दिवसभराच्या चौकशीनंतर त्यांना अटक झाली. पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्पात सुमारे एक हजार 34 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. याप्रकरणी मनी लाँडरिंग कायद्यान्वये गुन्हा दाखल करून ईडी तपास करत आहे.