राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.. राज्यात लवकरच तब्बल साडेसात हजार पोलिसांची भरती केली जाणार असल्याची माेठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. औरंगाबाद दौऱ्यातील एका कार्यक्रमानिमित्त आपल्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे यांनी ही घोषणा केली…
महाविकास आघाडी सरकारनेही पोलिस भरतीबाबत (Police recruitment) अनेकदा जाहीर केले होते.. त्यानंतर सत्तांतर झाले.. मुख्यमंत्रीपदी शिंदे यांची निवड झाल्यापासून या सरकारने लोकप्रिय घोषणांचा धडाका लावला आहे.. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच शिंदे हे राज्याचा दौरा करीत आहेत. शनिवारी (ता. 30) व रविवारी (ता. 31) त्यांनी औरंगाबादचा दौरा केला.
औरंगाबाद शहरातील टीव्ही सेंटर भागातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले. येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या नूतनीकरणासाठी त्यांनी पाच कोटी रुपयांची घोषणा केली. यावेळी तिथे पोलिस भरतीची तयारी करणारी अनेक तरुण जमा झाले होते. मुख्यमंत्र्यांना पाहून या तरुणांनी ‘पोलिस भरती’बाबत घोषणाबाजी सुरु केली..
तरुणांकडून सातत्याने होणारी घोषणाबाजी पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढील काही महिन्यातच राज्यात सुमारे साडेसात हजार पोलिस कर्मचाऱ्यांची भरती करणार असल्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेचे तरुणांनी सुद्धा टाळ्या वाजवून स्वागत केले. या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठवाडा व राज्यातील विविध विकासकामांच्या घोषणा केल्या.
ठाकरे सरकारकडूनही घोषणा
दरम्यान, राज्यात ठाकरे सरकारने असताना, तत्कालिन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यात दोन टप्प्यात पोलिस भरती करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात 5 हजार पोलिसांची भरती पूर्ण झाली असून, दुसऱ्या टप्प्यात 7231 पदांसाठीची भरती केली जाणार होती.. मात्र, नंतर सत्तांतर झाल्याने ही प्रक्रिया रखडली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही राहिलेली पोलिस भरती करण्याची घोषणा केल्याने राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.. दुसऱ्या टप्प्यातील पोलिस भरतीची प्रक्रिया लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे..