ताजी बातमी ऑनलाईन टीम
मिरज; येथील आंबेडकर उद्यानाच्या पाठीमागे नियोजित फूड पॉईंटची गरज नसल्यास ज्या विक्रेत्यांचे पैसे घेतले आहेत, त्यांना ते पैसे परत दिले जातील, असे आयुक्त नितीन कापडणीस यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
मिरज शहरात एकाही ठिकाणी फूड पॉईंट नाही. त्यामुळे नागरिकांची व विक्रेत्यांची गैरसोय होते. शिवाय वाहतुकीला अडथळा होतो. नागरिकांची व विक्रेत्यांची गरज आहे, अशा जागेवर फूड पॉईंट करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्यानुसार पायलट प्रोजेक्ट म्हणून मिरजेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या पाठीमागील रिकाम्या जागेत फूड पॉईंट उभारण्याचे नियोजन महानगरपालिकेकडून करण्यात आले होते. फूड विक्रेत्यांकडून तीन लाख रुपये घेऊन प्रत्येकाला सहा बाय सहाचे खोके देण्यात येणार आहे. त्या तीन लाखांपैकी एक लाख रुपये अॅडव्हान्स घेण्यात आले आहे. या खोक्यांपैकी एक खोके मॉडेल म्हणून तयार करण्यात आले. त्या खोक्यांमध्ये काही बदल करावयाचा असल्यास फूड विक्रेत्यांना दाखवणे गरजेचे असल्यामुळे आज आयुक्त नितीन कापडणीस यांच्या उपस्थितीत विक्रेत्यांना ते दाखवण्यात आले. या ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक, पाणी निचरा होण्यासाठी व्यवस्था, दोन्ही बाजूला गेट, सीसीटीव्ही अशा सोयी- सुविधा देण्यात येणार असल्याचे आयुक्त कापडणीस यांनी विक्रेत्यांना सांगितले.
यावेळी विक्रेत्यांनी आयुक्त कापडणीस यांना प्रश्नांचा भडीमार केला. त्यामुळे आयुक्त कापडणीस यांनी हा फूड पॉईंट नको असल्यास तसे सांगावे. ज्यांचे पैसे महापालिकेकडे जमा झाले आहेत, त्यांचे पैसे आम्ही त्वरित देऊ, असे सांगितले. त्यानंतर आयुक्त कापडणीस व विक्रेते तेथून निघून गेले.