राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तारूढ झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात नव्या राजकीय समीकरणांची मांडणी होऊ लागली आहे.
गेली दोन दशके संघर्ष करणारे खासदार संजय मंडलिक आणि खासदार धनंजय महाडिक यांचे राजकीय मनोमीलन होऊ घातले आहे. तर दुसरे शिंदे समर्थक खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यातील संघर्ष पुन्हा नव्याने पेटण्याची चिन्हे आहेत. या राजकीय स्थित्यंतरामुळे जिल्ह्याचे राजकारणच बदलून गेले आहे.
राज्यात सत्तांतर झाल्याचे पडसाद कोल्हापूर जिल्ह्यातही ठळकपणे उमटत आहेत. एकाहून एक धक्कादायक घटनांची मालिकाच जणू रोज सुरू आहे. आधी शिंदे यांना माजी राज्यमंत्री, आमदार, माजी आमदार यांनी पाठिंबा दिला. त्यानंतर जिल्ह्यातील दोन्ही खासदारांनी ठाकरे यांच्यापासून बाजूला जाण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेना आणखीच कमकुवत झाली आहे.
दरम्यान, शिवसेनेतील या बदलांमुळे जिल्ह्यात नव्याने राजकीय मांडणी आकारास येताना दिसत आहे. पहिली ठळक घटना म्हणजे गेली दोन दशके संघर्ष करणारे खासदार संजय मंडलिक आणि खासदार धनंजय महाडिक यांचे राजकीय मनोमीलन होऊ घातले आहे. स्वतः राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक यांनी याचे सूतोवाच केले आहे. उद्धव ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करण्यापूर्वी खासदार संजय मंडलिक यांनी देवेंद्र फडणवीस आणि माझ्याशी चर्चा केली होती, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. याचवेळी महाडिक यांनी मंडलिक यांच्यासोबत नवी राजकीय वाटचाल होणार असल्याचे संकेतही दिले आहे.
ही नवी राजकीय मैत्री महाविकास आघाडीला त्रासदायक ठरण्याची चिन्हे आहेत. कारण अद्याप महाविकास आघाडीकडे उमेदवार निश्चित नाही. गेल्यावेळी काँग्रेसचे सतेज पाटील, राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मंडलिक यांच्या मागे ताकद लावून त्यांना निवडून आणले होते. त्यांचा मंडलिक हा उमेदवारीचा मुख्य आधार दुरावला आहे. नव्या उमेदवाराचा शोध घ्यावा लागत असताना हसन मुश्रीफ यांचे नाव पुढे आले आहे. पण खुद्द मुश्रीफ यांनीच लोकसभा निवडणूक लढवण्याचा इरादा नसल्याचे स्पष्ट करीत आपण पुन्हा कागलमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे नमूद केले आहे. परिणामी महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याचा पेच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यासमोर असणार आहे.
हातकणंगलेत संघर्षाची नांदी
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात वादाच्या तोफा धडाडत आहेत. खा. धैर्यशील माने यांनीही शिंदे गटात प्रवेश केला असल्याने या गटाचे ते उमेदवार असणार हे आता उघड झाले आहे. दरम्यान, भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे यांनी व्यक्त केली आहे. याच वेळी आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुन्हा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी खासदार माने यांच्यावर गटबदलू असल्याची टीका केली. माने समर्थकांनी सातत्याने झेंडे बदलणाऱ्या शेट्टी यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. माने-शेट्टी या आजी-माजी खासदारातील वाद आतापासूनच गाजू लागला आहे. शेट्टी हे नेमक्या कोणाकडून निवडणूक लढवणार याकडे लक्ष वेधले आहे.