गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावर हुनगीनहाळ गावाजवळील ओढ्यानजीक रस्त्याकडेचे पडणारे झाड चुकविताना राज्य परिवहन मंडळाच्या एसटीबस (एम.एच.१४बी.टी.-०५०९) अपघात झाला. यावेळी एसटी बस झाडावर आदळून झालेल्या अपघातात दोन प्रवासी जखमी झाले. ही दुर्घटना आज (शनिवार) सकाळी १०.२० वाजण्याच्या सुमारास घडली. तथापी, चालक रणवीर काशिनाथ जुगदार (रा.कोल्हापूर) यांच्या प्रसंगावधानाने ३७ प्रवाशांचे प्राण वाचले. अन्यथा पावसाने रस्त्यावर 1 कोसळणारे झाड एसटी बसवर कोसळून मोठी जीवितहानी झाली असती. गाडीतील प्रवाशांच्या दृष्टीने बसचालक देवदूत ठरला. चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांतून त्याचे कौतुक होत आहे.
कोल्हापूर -दोडामार्ग या कोल्हापूर आगाराच्या बसला हा अपघात झाला. या अपघातात स्नेहल शशिकांत पाटील (वय- ५७, रा. कोळीन्द्रे, ता.चंदगड) व माधुरी मारुती केसरकर (वय-३५,रा.नेसरी) हे प्रवासी जखमी झाले. या अपघातातील अन्य प्रवासी सुखरूप आहेत. या अपघातातील जखमींना गडहिंग्लजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.