कोल्हापूर : शहरातील विद्युततारांच्या जंजाळामुळे निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी सुमारे पाच वर्षांपासून रेंगाळलेला भूमिगत विद्युतवाहिन्यांचा प्रश्न यंदा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदा तरी विद्युततारांचे जंजाळ हटणार का, असा सवाल यानिमित्ताने शहरवासीयांतून केला जात आहे.
शहरातील वर्दळीचा भाग असलेले महालक्ष्मी मंदिर परिसर, महाद्वार रोड, गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग, राजारामपुरी, ताराबाई पार्क तसेच अन्य वस्त्यांतील वीजतारा भूमिगत करणे आवश्यक आहे. त्यासाठी 2016 च्या सुमारास केंद्र सरकारच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत 22 कोटींचा निधी प्राप्त झाला होता. मात्र, महापालिकेची रेंगाळलेली प्रक्रिया, ताकतुंबा आणि लालफितीच्या कारभारामुळे हा निधी परत गेला आहे. या योजनेसाठी निधी केंद्र सरकारकडून मिळणार होता, महावितरण कंपनी योजना राबविणार होती; मग परवानगी द्यायला महापालिकेची अडचण काय? असा संतप्त सवाल केला जात आहे. सप्टेंबर 2018 पर्यंत ही कामे पूर्ण होणे अपेक्षित होते; पण महापालिकेने खोदाईला परवानगीस टाळाटाळ केल्याने कामच रद्द झाले.