Sunday, August 3, 2025
Homeराजकीय घडामोडीशिंदे गटाला शिवसेनेचा आक्रमक इशारा

शिंदे गटाला शिवसेनेचा आक्रमक इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आमदार आणि खासदारांसह केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत थेट पक्षावरच दावा सांगितला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह आपल्याला मिळावं, असा शिंदे गटाचा प्रयत्न आहे. एकीकडे ही कायदेशीर लढाई सुरू असताना आता मैदानातही उद्धव ठाकरेंना आव्हान देण्याच्या हालचाली शिंदे यांच्याकडून सुरू आहेत. त्यासाठी दादरमध्ये शिंदे गटाकडून मध्यवर्ती कार्यालय उभारण्यात येणार आहे. या मुद्द्यावरून आता शिवसेनेनं एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर बंडखोरांचा जोरदार समाचार घेत आक्रमक इशारा (warning) दिला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अस्सल स्वाभिमानी मराठी माणसांचे, हिंदुत्वाचे संघटन शिवसेनेच्या रूपात उभारले. ५६ वर्षांनंतरही या संघटनेचा पाया व कळस भक्कम आणि तितकाच अजेय आहे. अनेक लाटा, तडाखे, विश्वासघातकी वावटळींना तोंड देत शिवसेना भवन उभे आहे. ही इमारत नसून छत्रपती शिवरायांच्या विचारांचा अभेद्य दुर्ग आहे तो! बारा भानगडीतून निर्माण झालेला हा अड्डा नसून ही वास्तू म्हणजे महाराष्ट्राचे अभेद्य कवच आहे, हे गटा-तटाच्या भानगडबाज लोकांनी ध्यानात ठेवावे,’ अशा शब्दांत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून शिंदे गटाला इशारा (warning) देण्यात आला आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर झालेल्या खातेवाटपावरून शिंदे गटातील काही मंत्री नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये दादा भुसे, संदीपान भुमरे आणि दीपक केसरकर यांची नावे असल्याचं बोललं जातं. तसंच मंत्रिमंडळातून डावललेले औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट हेदेखील उघडपणे आपली नाराजी व्यक्त करत आहेत. यावरून निशाणा साधताना शिवसेनेनं म्हटलं आहे की, ‘भारतीय जनता पक्षाला मुंबईवरील शिवसेनेचा भगवा उतरवायचा आहे. मराठी माणसाला गुलाम-लाचार करून मुंबई गिळायची आहे व त्याकामी शिंदे गटाची भानगड त्यांनी निर्माण केली. ही बाब गंभीर आहे. शिंदे गटाच्या भानगडीस संजय शिरसाट यांनी तोंड फोडले. ‘ह्योच नवरा पायजे’च्या तालावर ते म्हणाले, ”मंत्रीपद आता हवेच.”

पन्नास जणांना हवे म्हणजे हवेच. चला, या निमित्ताने एक जळजळीत सत्य बाहेर आले. शिंदे गटाने शिवसेना सोडताना स्वाभिमान, हिंदुत्व वगैरेंचा जो मुद्दा समोर आणला तो सपशेल झूठ आहे. जे पन्नास जण शिंदे गटात गेले त्यांना मंत्रीपदे व काही ना काही हवे म्हणून गेले. हिंदुत्वाशी त्यांचा संबंध नाही,’ असं टीकास्त्र शिवसेनेनं सोडलं आहे.

दरम्यान, जे ५० जण शिंदे गटात गेले त्यांना मंत्रिपदे व काही ना काही हवे म्हणून गेले. हिंदुत्वाशी त्यांचा संबंध नाही. ज्यांना मंत्रिपदे वगैरे मिळणार नाहीत त्यांना प्रति शिवसेना भवनातून प्रति-मंत्रिपदे देता येतील काय? असा खोचक सवालही शिवसेनेनं विचारला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -