‘गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिजबाला…’ आदी गाण्यांच्या तालात, शरीरिक समन्वय साधत उंचच्या उंच मानवी मनोरे करून लाखो रुपयांच्या बक्षिसांची दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर यंदा दहीहंडीचा सोहळा (ceremony) होणार असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, यंदाच्या दहीहंडी सोहळ्याला राजकीय पक्षांच्या सहभागाची किनार असल्याने लाखो रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव पाहायला मिळणार आहे.
कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे गेली दोन वर्षे दहीहंडीचा सोहळा झाला नव्हता. यंदा कोरोनाचा कहर कमी झाल्याने इतर सण-उत्सवांप्रमाणेच गोकुळ अष्टमीनिमित्त दहीहंडीचा सोहळा निर्बंधमुक्त पद्धतीने साजरा होणार आहे. याची जय्यत तयारी संयोजक तसेच पोलिस व मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी 4 पासून दहीहंडीचा थरार सेलिब्रिटींची उपस्थिती, नृत्याविष्कार आणि अत्याधुनिक साऊंड सिस्टीम व लेसर शो अशा विविधतेत पाहायला मिळणार आहे.
दुपारनंतर वाहतूक मार्गात बदल
शहरातील दसरा चौक, भाऊसिंगजी रोड, छत्रपती शिवाजी चौक, महाद्वाररोड, मिरजकर तिकटी यासह ठिकठिकाणी दहीहंडीचे सोहळे (ceremony) होणार असल्याने वाहतूक शाखेने मार्गात बदल केले आहेत. व्हिनस कॉर्नर-सीपीआर चौक-भाऊसिंगजी रोड ते जुना राजवाडा, महाद्वाररोड, गंगावेस-माळकर तिकटी हे मार्ग शुक्रवारी दुपारनंतर वाहतुकीस बंद असणार आहेत. या मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळण्यात येणार आहे.
पार्किंगची व्यवस्था अशी…
दहीहंडी पाहायला येणार्या लोकांसाठी चित्रदुर्गमठ व करवीर पंचायत समिती येथे दुचाकी पार्किंग, व्हिनस कॉर्नर गाडीअड्डा तसेच छत्रपती शाहू व शिवाजी स्टेडियम परिसरात दुचाकी व चारचाकी पार्किंग असणार आहे. शहाजी महाविद्यालय, खानविलकर पेट्रोल पंप, शंभरफुटी रस्ता, प्रायव्हेट हायस्कूल, बिंदू चौक मनपा पार्किंग येथेही पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.