भाजप नेत्या सोनाली फोगट (Sonali Phogat) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. त्या 42 वर्षांच्या होत्या. सोनाली फोगट या त्यांच्या काही स्टाफ सदस्यांसोबत गोव्याला गेल्या होत्या. त्याठिकाणी काल रात्री त्यांना हृदयविकाराचा (Heart Attack) झटका आला आणि त्यांचे निधन झाले. सोनाली यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. सोनाली फोगट यांचे भाऊ वतन ढाका यांनी त्यांचे निधन झाले असल्याची माहिती दिली. सोनाली फोगट यांनी भाजप नेते कुलदीप बिश्नोई यांच्याविरुद्ध हरियाणाच्या आदमपूर मतदारसंघातून शेवटची निवडणूक लढवली होती ज्यात त्याचा पराभव झाला होता.
सोनाली फोगट यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी हिसारमधून त्यांनी कुलदीप बिश्नोई यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. कुलदीप बिश्नोई यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र अलीकडेच त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला. त्यानंतर आदमपूर मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे.
दरम्यान, सोनाली फोगट आगामी आदमपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या तिकीटावर दावा करत होत्या. गेल्या आठवड्यात कुलदीप बिश्नोई यांनीही सोनाली फोगट यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. ज्याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले होते. 2016 मध्ये सोनाली फोगट यांचा पती संजय फोगट देखील फार्म हाऊसमध्ये मृतावस्थेत आढळले होते. सोनाली फोगट या सोशल मीडियावर खूप सक्रीय असायच्या. त्या त्यांच्या टिकटॉक व्हिडिओंमुळे चांगल्याच चर्चेत असायच्या. त्यांनी बिग बॉसमध्ये देखील सहभाग घेतला होता.