एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यापासून त्यांना राज्यभरातून दिवसेंदिवस पाठिंबा वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. (political news) यातच राज्यातील दोन महत्त्वाच्या जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्त्यांसह, अनेक पदाधिकारी, नेते शिंदे गटात सामील झाले आहे.
सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी, सध्या सुरू असलेले विधिमंडळाचे अधिवेशन, त्यात विरोधकांकडून सरकारला कोंडीत पकडण्याचे होत असलेले प्रयत्न या पार्श्वभूमीवरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणाऱ्यांचा ओघ सुरूच आहे. अहमदनगरसह मुंबईतील आणखी काही जणांनी शिंदे गटात प्रवेश घेतला आहे. (political news) विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातून हा वाढता प्रतिसाद पाहता शिंदे गटाने नगर जिल्हा प्रमुख म्हणून महापालिकेतील नगरसेवक अनिल शिंदे यांची नियुक्ती जाहीर केली आहे. शिंदे यांनीच सर्वप्रथम शिंदे गटात प्रवेश केला होता आणि आतापर्यंतचे प्रवेश घडवून आणण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे.
एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जाऊन प्रवेश
एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. मुंबईतील भांडुप विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अशोक पाटील व त्यांची पत्नी आणि मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका मीनाक्षी अशोक पाटील यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह भेट घेऊन युती सरकारला आपला पाठिंबा जाहीर केला. त्यांच्यासोबत महिला उपविभाग संघटक राजश्री मांदविलकर, महिला शाखा संघटक सुरेखा पांचाळ, माजी शाखाप्रमुख कृष्णा शेलार, माजी शाखाप्रमुख विजय परब यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी युती सरकारला आपला पाठींबा जाहीर केला, असे ट्विट एकनाथ शिंदेंनी केले.
दरम्यान, अहमदनगर येथून आलेले तालुका प्रमुख विकास उर्फ बंडू रोहकले, पाडळीचे सरपंच हरीश दावभट, भाळवणीचे सरपंच बबन चेमटे, विकास सोसायटीचे चेअरमन ठकसेन रोहोकले, चेअरमन बाबासाहेब रोहकले, शाखाप्रमुख अक्षय रोहकले यांनी देखील याप्रसंगी युती सरकारला आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी अनिल शिंदे यांची अहमदनगर जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्यासोबत खास नागपूरहून माझ्या भेटीसाठी आलेल्या दिव्यांग बांधवांना भेटून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी नक्की प्रयत्न करू अशी ग्वाही एकनाथ शिंदेंनी दिली.