जैन धर्मियांचा पर्युषण महापर्व हा पवित्र सण 24 ते 31 ऑगस्ट या कालावधीत साजरा होत आहे. त्यानिमित्त राज्य शासनाने 24 व 31 ऑगस्टला कत्तलखाने, मांस विक्रीची दुकाने बंद ठेवावीत, असे आदेश दिले आहेत. परंतु, महापालिका प्रशासनाच्या वतीने 24 ते 31 ऑगस्ट या कालावधीत कोल्हापूर शहरातील कत्तलखाने, मांस विक्रीची दुकाने आठ दिवस बंद राहतील, असे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
अखेर महापालिकेने बुधवारी चूक निदर्शनास आल्यानंतर 24 व 31 ऑगस्ट या दोनच दिवशी मांस विक्रीची दुकाने बंद राहतील, असा खुलासा पत्रकाद्वारे केला आहे. दरम्यान, महापालिका अधिकाऱ्यांच्या गलथान कारभाराचा शहरातील मटण विक्रेत्यांना नाहक त्रास सहन करावा लागल्याने तीव-संताप व्यक्त केला जात आहे. खाटिक समाजानेही महापालिकेने 24 व 31 ऑगस्टला दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. आता फक्त 31 ऑगस्टलाच मटण विक्रीची दुकान बंद राहणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.