सांगली जिल्ह्यातील वाळवा आणि शिराळा या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची बांधणी भाजपने सुरू केली असून यामागे केवळ लोकसभाच नव्हे तर वेळ पडलीच तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची कोंडी करून शिराळा विधानसभेची जागा पदरात पाडून घ्यायचीच असा प्रयत्न दिसत आहे.
या दृष्टीने केंद्रीय विधि व न्याय राज्यमंत्री सत्यपालसिंह बघेल यांचा संवाद दौरा झाला. यानिमित्ताने इस्लामपूर येथे माजी नगराध्यक्ष निशिकांत भोसले पाटील आणि माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व महाडिक गटाने दोन स्वतंत्र मेळाव्यांचे आयोजन करून पक्षांतर्गत ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला.
लोकसभा निवडणुकीस अद्याप दीड वर्षांचा कालावधी असला तरी भाजपने त्याची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. विरोधी पक्ष अद्याप नेतृत्व कोणाचे यावरच चर्चा करायलाच तयार नसतानाही भाजप निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. याची प्रचीती केंद्रीय मंत्र्यांच्या दौर्यावरून आली. हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये वाळवा, शिराळय़ासह कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, शिरोळ, इचलकरंजी, शाहूवाडी या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या ठिकाणचे नेतृत्व सध्या धैर्यशील माने हे करीत असले तरी गत निवडणुकीवेळी भाजप-शिवसेना युतीतून हा विजय झाला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा हा मतदार संघ २०१४ च्या निवडणुकीमध्ये भाजपशी युती करून त्यांनी लोकसभेत प्रवेश केला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी काँग्रेसराष्ट्रवादीशी आघाडी करून निवडणुक लढविताना पराभव स्वीकारला, दरम्यानच्या काळात त्यांचे सहकारी माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भाजपच्या वळचणीला जाऊन रयत क्रांती संघटनेच्या नावाखाली वेगळी चूल मांडली. त्याचाही फटका शेट्टींना बसला होता. सेनेच्या उमेदवारीवर माने यांना लोकसभेची संधी मिळाली.
या मतदारसंघामध्ये असलेल्या सांगली जिल्ह्यातील वाळवा आणि शिराळा या दोन विधानसभा मतदारसंघांचे प्रतिनिधित्व सध्या राष्ट्रवादीकडे आहे. शिराळय़ात वाळवा तालुययातील ४८ गावांचा समावेश असल्याने इस्लामपूर विना या मतदारसंघावर विजयाचा मार्ग सुकर होऊ शकत नाही. आता तर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले शिवाजीराव नाईक यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीशी घरोबा केला आहे. यामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली असल्याचे निदान कागदावर तरी दिसत असले तरी महाडिक गटाने या मतदारसंघामध्ये विधानसभा निवडणुकीवेळी घेतलेली ५० हजार मते भाजपकडे आहेत हेही यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवे. लोकसभेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ असतानाही भाजपने पदाधिकारी मेळावा इस्लामपूरमध्ये घेण्यामागे राजकीय कारणे आहेत. मिरज, सांगली हे विधानसभा मतदारसंघ भाजपकडे असतानाही वाळवा आणि शिराळा हे मतदारसंघ भाजपकडे खेचण्याचे प्रयत्न आहेत. गेल्या वेळी निशिकांत पाटील यांनी अखेरच्या क्षणी अपक्ष म्हणून मैदानात उतरूनही तिरंगी झालेल्या लढतीमध्ये चांगले मतदान घेतले. याचबरोबर भाजपने उमेदवारी नाकारली असताना शिराळा मतदारसंघातून अपक्ष म्हणून मैदानात उतरूनही महाडिक गटाचे सम्राट महाडिक यांनी ४९ हजार मते घेतली. यामुळे या दोन मतदारसंघावर भाजपचे लक्ष राहणार हे स्पष्ट आहे.
राज्यातील समीकरणाचा परिणाम
लोकसभेचे विद्यमान सदस्य धैर्यशील माने हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे लोकसभेसाठी शिंदे गटाशी तडजोड झाली तर ही जागा भाजपला सोडावी लागणार आहे. मात्र, राज्यमंत्री बघेल यांनी शिवसेना आणि अकाली दलाने मैत्री तोडल्याचे सांगत लोकसभेसाठी मित्र करीत असताना अधिक सावधगिरी बाळगणार असल्याचे सांगितले. यावरून मैत्रीबाबत शिंदे गटाशी अद्याप पक्षीय पातळीवर कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र, लोकसभेच्या दृष्टीने पक्षाचे तयारी सुरू केली आहे हे स्पष्ट होते. वाळवा आणि शिराळा हे विधानसभेसाठी भाजपच्या दृष्टीने महत्त्वाचे मतदारसंघ ठरणार आहेत. त्या दिशेने भाजपची वाटचाल सुरू आहे. वाळव्यामध्ये निशिकांत पाटील हेच भाजपचे उमेदवार ठरण्याची शक्यता गृहीत धरून त्यांना ताकद देण्यासाठी हातकणंगले लोकसभेच्या निमित्ताने हा मेळावा पार पडला. राष्ट्रवादीचे आ. पाटील यांची वाळवा व शिराळय़ात कोंडी करून त्यांना राज्यभर प्रचारासाठी फिरता येऊ नये अशी भाजपची रणनीती दिसते.
स्वतंत्र मेळावे
प्रकाश शैक्षणिक संकुलामध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला महाडिक गटाचे सम्राट महाडिक यांनी उपस्थिती दर्शवली असली तरी माजी राज्यमंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत आणि जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक यांनी स्वतंत्रपणे मेळाव्याचे आयोजन केले. तालुका स्तरावरील हा मेळावा असल्याचे सांगण्यात येत असले तरी पेठ येथील नानासाहेब महाडिक शैक्षणिक संकुलामध्येही स्वतंत्रपणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने भाजपमध्ये सवतासुभा कायम राहील असे संकेत मिळत आहेत.