ताजी बातमी ऑनलाईन टीम
आज गौरी-गणपतीचे विसर्जन आहे. सहा दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर आज गणपती बाप्पा गौराईसोबत निरोप घेणार आहेत. गणपती बाप्पा आणि गौराईच्या विसर्जनासाठी प्रशासन सज्ज झाले असून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबईतील समुद्रकिनारे आणि तलावांच्या ठिकाणी प्रशासनाकडून विसर्जनसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे त्याचसोबत सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलिसांचा कडक बंदोबस्त देखील असणार आहे.
यावर्षी कोरोना निर्बंध हटवण्यात आल्यामुळे राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे. पाच दिवसांच्या बाप्पांना निरोप दिल्यानंतर आज गौरी-गणपतीला निरोप देण्यात येणार आहे. गौरी-गणपती विसर्जनसाठी मुंबई महानगर पालिकेकडून (BMC) विसर्जनाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. पालिकेकडून (BMC) मुंबईतील समुद्र किनारे आणि तलावांच्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मुंबईतील प्रमुख विसर्जन स्थळी 211 स्वागत कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विसर्जनाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
यावर्षी गणपती बाप्पापाठोपाठ रविवारी माहेरवाशीण गौराईचे आगमन झाले. रविवारी गौराईचे पूजन करण्यात आले आणि नैवेद्य दाखवण्यात आला. तीन दिवसांच्या पाहुणचारानंतर गौराई आज निरोप घेणार आहे. गौराईसोबतच सहा दिवसांच्या पाहुणचारानंतर गणपती बाप्पा देखील निरोप घेणार आहेत. आज गणेशभक्त जड अंत:करणाने बाप्पाला आणि गौराईला निरोप देणार आहेत. आज गौराईचे विसर्जन होणार आहे. गौरी विसर्जनासाठी सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 8 वाजेपर्यंतचा मुहूर्त आहे. त्यामुळे या वेळेत आपल्या सोयीनुसार गौरी-गणपतीचे विसर्जन करु शकता.




