भारतीय महिला संघाने एक मोठा विक्रम करत मालिकेतील दुसऱ्या वनडेत इंग्लंडचा 88 धावांनी पराभव केला. कँटरबरी येथे खेळल्या गेलेल्या या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरने दमदार कामगिरी करत 143 धावांची नाबाद खेळी खेळली. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. कर्णधार हरमनप्रीतच्या या दमदार खेळीमुळे तिचे कौतुक केले जात आहे.
23 वर्षांची प्रतीक्षा संपली –
भारतीय महिला संघानेही जवळपास 23 वर्षांची प्रतीक्षा संपवली. या संघाने 1999 नंतर इंग्लंडच्या भूमीवर पहिली वनडे मालिका जिंकली आहे. इंग्लंडमध्ये वनडेमध्ये सर्वाधिक द्विपक्षीय मालिका जिंकण्याच्या बाबतीत भारतीय संघ न्यूझीलंडसह संयुक्त दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत इंग्लंडच्या भूमीवर दोनदा वनडे मालिका जिंकली आहे.