भारतीय क्रिकेट संघाची स्टार सलामीवीर स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) एक विक्रम केला आहे. ती शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यानंतर सर्वात वेगाने 3000 वनडे रन पूर्ण करणारी तिसरी खेळाडू बनली आहे. यासोबतच ती सर्वात वेगाने धावा करणारी महिला खेळाडू देखील बनली. बुधवारी इंग्लंडविरुद्धच्या तिच्या संघाच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तिने ही कामगिरी केली. धवनने 72 डावात 3000 वनडे धावा (ODI runs) पूर्ण केल्या तर कोहलीने 75 डावात हा पराक्रम केला. मंधानाने 76 व्या डावात कोहलीपेक्षा एक डाव जास्त खेळून हे स्थान गाठले.
मितालीला टाकले मागे
डावखुऱ्या सलामीवीर फलंदाज स्मृतीने 2013 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तिच्या या फॉरमॅटमध्ये पाच शतके आणि 24 अर्धशतके आहेत आणि ती मिताली राज आणि हरमनप्रीत कौर नंतर 3000 धावा करणारी तिसरी भारतीय महिला खेळाडू आहे. सर्वात वेगवान भारतीय महिला क्रिकेटपटूच्या बाबतीत, मंधानाने माजी कर्णधार मितालीला मागे टाकले, जिने 88 डावांमध्ये 3000 धावांचा टप्पा गाठला होता.
22 महिला खेळाडूंनी केल्या आहेत एवढ्या धावा
एकूण 22 महिला खेळाडूंनी 3000 हून अधिक एकदिवसीय धावा केल्या आहेत. परंतु मंधानापेक्षा फक्त दोघांनीच वेगवान कामगिरी केली आहे. ज्यामध्ये बेलिंडा क्लार्क (62 डाव) आणि मेग लॅनिंग (64 डाव) यांचा समावेश आहे.
स्मृतीची दमदार खेळी
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेली मालिका ही भारतासाठी आयसीसी महिला चॅम्पियनशिप सायकलमधील दुसरी मालिका आहे. ही स्पर्धा 2025 मध्ये होणाऱ्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता फेरी ठरवेल. मंधानाने होव येथे 99 चेंडूत 91 धावा करून मालिकेची सुरुवात केली आणि रविवारी भारताला सात गडी राखून विजय मिळवून दिला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही तिने चांगली सुरुवात केली आणि सोफी एक्लेस्टोन झेल घेण्यापूर्वी 51 चेंडूत 40 धावा केल्या.