उदगाव येथील सांगली-कोल्हापूर बायपास महामार्गावरील खड्डयामुळे दुचाकीवरुन पडून मागून येणारया टेम्पोच्या धडकेत प्रमोद दत्तात्रय शेलार (वय 52 रा. माळवाडी उदगांव ता. शिरोळ) हे ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. येथील बायपास महामार्गावरील जुन्या टोलनाका जवळील ओढय़ाजवळील परीसरात ही घटना घडली. याबाबतची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत पोलिसांत सुरु होते.
याबाबत माहिती अशी, मयत शेलार हे उमळवाड येथील कार्यक्रम संपवून रात्री अकराच्या सुमारास उदगांवकडे येत होते. शेलार मागे बसले होते. यावेळी सांगली कोल्हापूर बायपास महामार्गावरील पडलेल्या खड्डयामुळे शेलार मोटरसायकलवरुन खाली पडले. व पाठीमागून येत असलेला टेम्पो त्यांच्या अंगावरुन गेल्याने त्याच्या डोकीस व पायास गंभीर दुखापत झाली.
जखमी शेलार यांना तातडीने सांगली येथील सिव्हील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सांगली कोल्हापूर महामार्गाच्या खड्डयामुळे सातत्याने छोटे-मोठे अपघात होत आहेत.त्यामुळे तात्काळ सांगली कोल्हापूर महामार्गाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याची मागणी वाहनधारक व ग्रामस्थातून होत आहे.