राज्यात काही दिवसांपासून अनेक भागांत सपाटून झालेल्या पावसाने मागच्या 3-4 दिवसांपासून मात्र आराम घेतल्याने सध्या ऊन-सावलीचा खेळ सुरू असताना आपल्याला दिसतच असेल. पण हवामान विभागाने कालपासून राज्यातील काही ठिकाणी पावसाचा अलर्ट दिला आहे. पावसाने मोजक्या ठिकाणी थैमान घातले असता आज काही तासांसापून मुंबई आणि उपनगरात पावसाची रिपरिप झाल्याचं समजत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज शनिवारी (दि. 24 सप्टेंबर) भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, वर्धा, नागपूर आणि गडचिरोलीमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून या ठिकाणी हवामान विभागाने यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. के. एस. होसळीकर यांनी वायव्य भारतातील मैदानी भागात आज आणि उद्या अशा दोन्ही दिवशी पाऊस जास्त प्रमाणात पडू शकतो, असा अंदाज (Rain Alert) व्यक्त केला आहे.
राज्यभर संततधार तर कुठे अति प्रमाणात झालेल्या पावसाने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जराशी विश्रांती घेतली होती. पण आज (ता. 24 सप्टेंबर 2022) सकाळी मुंबई व शहरामध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावली. तरी सकाळी 7 वाजेपासून ते 8 वाजेपर्यंत या एका तासातच रावळी कॅम्प येथे जवजवळ 28 मिमी तर सायन माटुंगा येथे 21 मिमी पावसाची नोंद झाली. पूर्व पश्चिम उपनगरातही तासाभरात मुसळधार पाऊस झाला असल्याचं कळतंय.
आज (दि.24) आणि उद्या (दि.25) कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही आणि तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो तर पुन्हा पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये म्हणजेच 27 सप्टेंबर पर्यंत गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे.



