ताजी बातमी ऑनलाईन टीम
गेल्या दोन वर्षापासून बंद असलेली कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा 4 ऑक्टोरबपासून पुन्हा सुरु होत आहे. स्टार एअरवेजकडून ही विमानसेवा सुरु करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय विमान उडाणमंत्री ज्योतीरादित्य सिंदीया यांच्या उपस्थितीत या सेवेला प्रारंभ करण्यात येत आहे. कोल्हापूर विमानतळावर गेल्या पाच वर्षापासून विकासकामे सुरु आहेत. नाईट लॅडिंगचे काम पूर्ण झाले असून आता रात्रीच्या वेळीही कोल्हापूरातून विमानाचे उडाण होऊ शकणार आहे. धावपटीचा विस्तार करण्यात आला आहे. टर्मिनल बिल्डिंगचे काम प्रगतीपथावर असून मार्च 2023 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. सद्या तिरुपती, हैदराबाद, अहमदाबाद या मार्गावर विमानसेवा सुरु आहे. या विमानसेवेला प्रतिसाद आहे. मात्र कोल्हापूर- मुंबई ही विमानसेवा बंद असल्याने प्रवाशातून या मार्गावर विमानसेवा सुरु करण्याची मागणी होत होती.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय विमान उडाण मंत्री ज्योतीरादित्य सिंदीया यांच्याकडे कोल्हापूर मुंबई मार्गावर विमान सुरु करण्यासाठी पाठपुरावा केला. यामुळे 4 ऑक्टोरबपासून या मार्गावर स्टार एअरवेजची विमानसेवा सुरु होत आहे. मुंबईतून सकाळी 10.30 वाजता उडाण होऊन कोल्हापूरात सकाळी 11.25 वाजता विमान पोहोचणार आहे. कोल्हापूरातून 11.50 वाजता उडाण होऊन मुंबईत दुपारी 12. 45 वाजता पोहोचणार आहे. आठवडय़ातील मंगळवार, गुरुवार आणि शनिवार अशी तीन दिवस ही सेवा सुरु राहणार आहे.