ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडमुळे शिवसेनेत दोन गटं पडली आहेत. या दोन्ही गटाने पक्ष आपलाच असल्याची दावेदारी निवडणूक आयोगाकडे सादर केल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणुक चिन्न गोठवले आणि पक्षाचे नाव देखील वापरण्यास दोन्ही गटांना मनाई केली आहे. शनिवारी सायंकाळी निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवले आणि सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत दोन्ही गटांना नवीन नाव आणि नवीन निवडणूक चिन्हाचे पर्याय सादर करण्यास सांगितले होते.
गटाच्या पक्षाचे नाव आणि नवीन चिन्हाच्या पर्यायांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या ठाकरे गटाच्या नेत्यांच्या बैठकीत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पक्षाच्या नवीन नाव आणि चिन्हावर चर्चा झाली. त्यानंतरच ही यादी निवडणूक आयोगाकडे देण्यात आली आहे. आता यावर निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे.
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले की आमच्या पक्षाचे नाव शिवसेना आहे. निवडणूक आयोगाने ‘शिवसेना (बाळासाहेब ठाकरे)’, ‘शिवसेना (प्रबोधनकार ठाकरे)’ किंवा ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ यांसह शिवसेनेशी संबंधित कोणतेही नाव दिल्यास ते आम्हाला मान्य असेल.
ठाकरे गटाकडून चिन्हासाठी हे तीन पर्याय
पुढे बोलताना अरविंद सावंत म्हणाले की ‘निवडणूक आयोगाने आमचे निवडणूक चिन्ह गोठवले आहे. नवीन चिन्हासाठी त्यांनी आमच्याकडे काही सूचना मागितल्या होत्या, त्यावर आम्ही आयोगाला ‘त्रिशूळ’, ‘मशाल’ आणि ‘उगवता सूर्य’ असे तीन पर्याय दिले आहेत. आता आम्हाला कोणते निवडणूक चिन्ह द्यायचे याचा निर्णय निवडणूक आयोग घेईल.
शिवसेनेच्या चिन्हाचा इतिहास
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 मध्ये शिवसेना नावाची संघटना स्थापन केली. त्यानंतर दोन वर्षांनी 1968 मध्ये शिवसेनेची राजकीय पक्ष म्हणून नोंद झाली. सुरुवातीला शिवसेना पक्षाचे निवडणूक चिन्ह ढाल आणि तलवार होते. दरम्यान 1971 मध्ये शिवसेनेने पहिली निवडणूक लढवली, परंतु तेव्हा पक्षाला विजय मिळवता आला नाही. त्यानंतर 1978 मध्ये पक्षाने रेल्वे इंजिन हे पक्षाचे चिन्ह बनवले. परंतु 1985 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने धनुष्यबाण चिन्हाचा वापर करून निवडणूक लढवली आणि तेव्हा पक्षाला चांगले यश मिळाले. तेव्हापासून धनुष्यपाण हे शिवसेनेचे निवढणूक चिन्ह बनवले.