बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Marath) लवकरच मराठी चित्रपटात पदार्पण करणार (Akshay Marathi Debut) आहे. महेश मांजरेकर यांच्या ‘वेधत मराठी वीर दौडले सात’ या ऐतिहासिक महाकाव्याद्वारे (Historical movie) अक्षय मराठीत पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. ‘राम सेतू’स्टार अक्षय पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) भूमिका साकारणार आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी ही घोषणा केली आहे. याआधी अजय देवगणने देखील शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित तानाजी हा चित्रपट केला आहे. त्यानंतर आता अक्षय कुमार शिवाजी महारांज्या भूमिकेत दिसणार आहे.
‘वेडात मराठी वीर दौडले सात’ या ऐतिहासिक चित्रपटाविषयी बोलताना अक्षय कुमार म्हणाला “ही माझ्यासाठी स्वप्नवत भूमिका आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारणे ही खूप मोठी जबाबदारी आहे असे मला वाटते.” ही ऐतिहासिक गाथा 1674 मध्ये स्वराज्यातील सात मराठा अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या असामान्य शौर्याचे दर्शन घडवते.
‘वेडात मराठी वीर दौडले सात’ हे ऐतिहासिक काव्य छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर सरदार विसाजी बल्लाळ, दीपोजी राऊतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्धी हिलाल, विठोजी शिंदे, सरनौबत कुडतोजी उर्फ प्रतापराव गुजर यांच्या शौर्याची गाथा आहे. या सात मावळ्यांनी मुघल सैन्यासमोर दाखवलेल्या धाडसावर हे काव्य लिहिले गेले आहे. यावरच आधारित चित्रपट महेश मांजरेकर करत असून त्यात अक्षय कुमार शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज भालजी पेंढारकर यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक घटनांवर आधारित चित्रपट बनवून इतिहास घडवला आहे. ऐतिहासिक चित्रपटांची ही परंपरा गेल्या काही वर्षात पुनरुज्जीवित होत आहे. अशात छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाले आहेत. यातच आता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी देखील एका चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित इतिहासाचे एक प्रभावी पान समोर येणार आहे. शिवकाळातील सात वीरांचे शौर्य आणि बलिदान या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे.