‘बिग बॉस मराठी’चा (Bigg Boss Marathi) सहावा सीझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. घरातील सदस्यांच्या कुरघोडी, वागणं, एकमेकांविरोधातली कट-कारस्थान सर्वच गोष्टी ऐन रंगात आल्या आहेत.
अहिराणी गाण्यासाठी प्रसिद्ध असलेला आणि खान्देशी किंग म्हणून नावारुपाला आलेला सचिन कुमावत बिग बॉसच्या घरातून एलिमिनेट झाला आहे. सचिन बिग बॉसच्या घरात म्हणावा तितका रमला नाही, असं म्हटलं तरी चालेल. मूळचा साध्यासुध्या स्वभावाचा सचिन कुमावत बिग बॉसच्या घरात कट-कारस्थान रचण्यात आणि खेळ समजण्यात कुठेतरी कमी पडला, अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरू आहे. पण, घरातील चांगला माणूस अशी ओळख त्याच्या चाहत्यांमध्ये निर्माण करण्यात मात्र सचिन कुमावत यशस्वी ठरला. त्याचं घरातील प्रत्येक स्पर्धकासोबत खूप घट्ट नातं निर्माण झालेलं. पण, घरात स्वतःसाठी स्टँड घेण्यात कमी पडल्यामुळे ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील त्याचा प्रवास संपला.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून सचिन कुमावत बाहेर गेल्यानंतर आता घरात 12 ते 13 स्पर्धक शिल्लक राहिले आहेत. अशातच आता आणखी एक वाईल्ड कार्ड एन्ट्री घरात होणार असल्याचं बोललं जात आहे. आधीच वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आलेल्या राखी सावंतनं घरातील सदस्यांच्या नाकी नऊ आणले आहेत. अशातच आता आणखी एका वाईल्ड कार्ड एन्ट्रीनं बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांचे धाबे दणाणार आहेत, हे मात्र नक्की.






