सातारा – कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने ऊसाला तीन हजारांहून अधिक दर देतात.तर सातारा जिल्ह्यात साखर कारखानदारांकडून ऊस दराबाबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गळचेपी केली जाते.
स्वत:च्या फायद्यासाठी या जिल्ह्यातील सर्व कारखानदार एकत्र येत असतील तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी देखील त्यांच्या ऊस दरासाठी एकत्र येऊन साखर कारखानदारांना आपली एकसंघ ताकद दाखविण्याची गरज आहे. असे ठोस प्रतिपादन स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.
खटाव तालुक्यातील कातरखटाव येथे काल (सोमवारी ता.१४) परिसरातील गावांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी मार्गदर्शन करताना शेट्टी बोलत होते.यावेळी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, सांगली
जिल्हाध्यक्ष महेश खराडे,सातारा जिल्हाध्यक्ष तानाजीराव देशमुख, राजेंद्र माने, तालुकाध्यक्ष दत्तात्रय घाडगे, सुर्यभान जाधव, सुर्यकांत भुजबळ ,प्रमोद देवकर, श्री. लावंड, सचिन पवार, शरदशेठ खाडे, पृथ्वीरात गोडसे, राजीव मुळीक, राजू फडतरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊसतोड व दराबाबत गळचेपी तसेच ऊस बिलांची
थकीत रक्कम देण्यास विलंब करणाऱ्या साखर कारखानदारांनी यासमस्यांबाबत तातडीने लक्ष द्यावे.अन्यथा साखर कारखानदारांना गुडघ्यावर आणू असा इशारा देऊन राजू शेट्टी म्हणाले की कोल्हापूर,सांगली जिल्ह्यात गेल्या वीस पंचवीस वर्षापूर्वी ऊसाचे आंदोलन सुरू झाले.गावोगावी लोकांच्यात जागरूकता निर्माण केली.त्यावेळी हा माणूस माथेफिरू आहे, भस्मासूर आहे म्हणून आपणास हिणविले गेले.
आपल्यावर अनेक आरोप केले तरीही न डगमगता आपण अव्याहतपणे कष्ट घेऊन शेतकऱ्यांना ऊस शेतीबाबत पूर्ण अर्थकारण समजून सांगितले, साखर
सम्राटांकडून शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक दाखवून दिली त्यावेळी शेतकरी जागरूक झाले. आज या दोन्ही जिल्ह्यात ऊसाला तीन हजार रूपयांहून अधिक दर दिला जातो.मात्र सातारा जिल्ह्यातच ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अडवणूक होताना दिसते.जिल्ह्यात अडीच हजारांच्या आसपासच ऊस दर दिला जातो.
स्वत:च्या फायद्यासाठी जिल्ह्यातील सर्व कारखानदार एकत्र येत असतील तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या ऊस दरासाठी एकत्र येणे गरजेचे आहे.तालुक्यातून जाणाऱ्या पुणे बंगळूरू या ग्रीन कॉरीडॉरच्या अखत्यारीत येणाऱ्या जमिनींना योग्य दर द्यावा.येत्या गुरूवारी (ता.१७) व शुक्रवारी (ता.१८ ) रोजी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उतरण्याचा निर्धार केला आहे. ऊस वाहतूकदारांनी आपली वाहतूक बंद ठेवून सहकार्याची भूमिका दाखवावी.