शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena chief Balasaheb Thackeray) यांचा आज 10 वा स्मृतीदिन आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या (Balasaheb Thackeray Death Anniversary) एक दिवस आधी म्हणजेच बुधवारी रात्री उशिरा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी दादरच्या शिवाजी पार्कमधील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्मृतीस्थळाचे (Balasaheb Thackeray Smritisthal) दर्शन घेतल्यामुळे वाद निर्माण झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी थेट स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवाजी पार्कमधील स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. पण स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन मुख्यमंत्री जात नाही तोपर्यंतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी मुख्यमंत्र्यांनी स्मृतीस्थळाचे दर्शन घेतल्यामुळे स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण केले. शिवसैनिकांनी स्मृतीस्थळावर गोमूत्र शिंपडून त्याचे शुद्धीकरण केले. यावेळी या शिवसैनिकांसोबत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत हे देखील उपस्थित होते.
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची पाहणी केली. स्मारकाची पाहणी झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, ‘बाळासाहेबांच्या स्मारकाचे पहिल्या टप्प्यातील सिव्हील वर्क म्हजेच बांधकाम 50 टक्के पूर्ण झाले आहे. मार्च 2023 आधी या स्मारकाचे काम पूर्ण होईल. या स्मारकाचा दुसरा टप्पा महत्त्वाचा असेल. कारण यामध्ये बाळासाहेबांचा राजकीय प्रवास, त्यांची व्यंगचित्र इकडे दाखवली जातील.’ तसंच स्मारक लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आम्ही आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले.
तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ‘बाळासाहेबांचे स्मारक जनतेचे असेल, ते जनतेचेच राहिल. त्याच्या मॅनेजिंग कमिटीमध्ये कोण आहे, कोण राहिल, याच्याशी आम्हाला देणंघेणं नाही. स्मारकाचं काम पूर्ण करून ते जनतेला समर्पित करण्यात रस आहे. समितीमध्ये कोण आहे, यात आम्हाला रस नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच या स्मारकाचे काम पूर्ण होईल.’, अशी ग्वाही त्यांनी दिली.






