सलगरे – टाकळी रस्त्यावर हनुमान नगर जवळ गणपती मंदिर येथे भरधाव मिक्सर डंपरने चक्क ३ वाहनांना (ट्रॅक्टरसहित) धडक दिल्याची घटना घडली आहे. या धडकेत मिक्सर डंपरमधील ५ ही जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात मिक्सर डंपर चा चक्काचूर झाला आहे. तसेच ट्रॅक्टरचेही प्रचंड नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड गोंधळ बघायला मिळाला. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, सलगरे – टाकळी रस्त्यावर हनुमान नगर जवळ गणपती मंदिर येथे रजपूत कंपनीच्या मिक्सर डंपर (MH17-T6352) ने उसाने भरलेल्या ट्रॅक्टर (KA28-TA5818) ला पाठीमागून जोरदार धडक दिली आहे. या ट्रॅक्टर च्या पुढे आणखी दोन उसाने भरलेले ट्रॅक्टर होते.
या अपघातात मिक्सर डंपर मधील ड्रायव्हर सहित अन्य चार जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच ट्रॅक्टरचे ड्रायव्हर चंद्रकांत शिंदे (रा.अभ्याळ ता.अथणी) हे देखील जखमी झाले आहेत. तसेच या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. या अपघातामुळे वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती.






