ऊस उत्पादक मागण्यांसाठी गेल्या दोन महिन्यापासून सातत्याने आंदोलन सुरू आहे. दिल्ली-पुण्याला हेलपाटे घातले. निवेदने दिली, विंनती अर्ज पाठवले. मात्र अजूनही गेल्या वर्षीच्या तुटलेल्य़ा ऊसाचा हिशोब झाला नाही. दोन टप्याच्या एफआरपी कायद्यात सुधारणा नाही, एफआरपीचे सूत्र बदलण्यास ठोस आश्वासन मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत म्हणून पुन्हा एकदा येत्या 25 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता संपूर्ण राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज दिला.
कोल्हापुरात पुणे- बेंगलोर महामार्गावर हे आंदोलन करणार असून, मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही अशी ठाम भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे.ताकदीने रस्त्यावर उतरा त्याशिवाय झोपलेले सरकार जागे होणार नाही असा सल्ला यावेळी त्यांनी दिला.
काय आहेत प्रमुख मागण्या?
-केंद्र सरकारने साखरेचा हमीभाव प्रतिक्विंटल 3500 करावा -इथेनॉलच्या दरात 5 रुपयांची वाढ करावी.
-ऊस परिषदेत केलेली एफआरपी अधिक 350 रुपये ही मागणी
कारखानदारांनी पूर्ण करावी.
-महामंडळ मार्फत मजुरांची नोंद करून ती त्या मार्फत पुरवावेत.
-वजनकाटे डिजिटल करा.
-मागील ऊस हंगामाचा हिशोब कारखानदारानी द्यावा.
-दोन टप्प्यात एफआरपी कायदा रद्द करावा.